'जन गण' म. न.

याचे होते, त्याचे होते; कोठे हे घर माझे होते
घुसखोरांनी घरटी केली; शाखा, तरुवर माझे होते

रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचे तंबू, त्यांची भाषा
खरेच आता वाटत नाही तेथे वावर माझे होते

शहरावरती हक्क सांगती द्राविड, उत्कल, वंग वगैरे
"जन गण"नेचे ते अधिनायक, भाग्य भयंकर माझे होते

मायमराठी स्फुंदत बोले, "काय, हुतात्म्यांनो, सांगू मी,
तेव्हा होते तसेच आता... केवळ लक्तर माझे होते... "

गिरगांवातुन डोंबिवलीला, गिरणगाव ते विरार-वसई
मुंबापूरीच्या बाहेरी का स्थित्यंतर माझे होते ?

चिडले सारे इंग्लिशवाले, चिडले सारे यदुकुल ग्वाले
उवाच आबा की गोळीला गोळी उत्तर माझे होते!

व्याघ्राची डरकाळी थकली, छावा करतो म्याँव म्याँव केवळ
तरी बोलला, "त्यातिल काही समरधुरंधर माझे होते"