१६ नोव्हेंबर. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान दिवस. या दिवशी एकाच अभियोगात एकाच तुरुंगात एकाच वेळी गदर उत्थानातील सात क्रांतिकारकांना हौतात्म्य प्राप्त झाले! हुतात्मा ’क्रांतिरत्न’ विष्णू गणेश पिंगळे, हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा, हुतात्मा सरदार बक्षिससिंग, हुतात्मा सरदार जगतसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग भुरसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग ईश्वरसिंग आणि हुतात्मा सरदार हरनामसिंग हे ते सात हुतात्मे. एकाच पर्वातील एकाच संघटनेच्या सात क्रांतिकारकांनाएकाच अभियोगात एकत्रित फाशी सुनावली गेल्याचा एकमेवाद्वितिय ऐतिहासीक प्रसंग.
गदर संग्राम म्हणजे साक्षात दुसरे १८५७! हिंदुस्थानचे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध! या युद्धाची बीजे रुजली होती अमेरिकेत. १९०८ ते १९१३ च्या दरम्यान गदर ची स्थापना, संघटन व सक्षमीकरण अमेरिकेत घडले व हिंदुस्थाना बाहेर राहून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक क्रांतिअध्वर्यू या संग्रामात सक्रिय सहभागी होते! क्रांतिपर्वातील मध्ययुगात उसळलेल्या या ज्वालामुखीमध्ये डॉ. खानखोजे, पंडित काशीराम, लाला हरदयाळ, क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा, डॉ. तारकनाथ दास, सरदार सोहनसिंग भकना, भाई परमानंद, सरदार हरनामसिंग ’तुंडा’, क्रांतिशिरोमणी राशबिहारी बोस, विनायकराव कपिले, बापुराव नांदेडकर, एम पी टी अचार्य असे महाभयंकर स्फोटक रसायन ठासून भरलेले होते.












गदर संघटना हा खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि तो विशाल वृत्तांत या लेखातील एक उपभाग म्हणून देणे उचित नाही, त्यासाठी मी एक स्वतंत्र लेख द्ययचा प्रयत्न करीन. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य अभिलाषा छातीशी बाळगणाऱ्या क्रांतिकारकांना स्थान, साधने व सामग्री या कशाचेच बंधन नसते हे गदर ने साऱ्या जगाला दाखवून दिले. गदर म्हणजे केवळ इच्छा वा दिवास्वप्न नव्हते तर त्यामागे ध्यासा बरोबरच जागतिक परिस्थितीचा आढावा, अभ्यास व त्याचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामाला लाभ कसा घेता येइल याचे परीपूर्ण नियोजन होते. हजारो मैल अंतरावरून हिंदुस्थानात सशस्त्र संग्राम उभा करण्याचे नियोजन, प्रशिक्षण, साधक असे राजकिय आंतरराष्ट्रिय संबंध संस्थापन व संगोपन, हिंदुस्थानातील सैन्यात क्रांतिची बीजे रुजवीणे व दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचे लक्ष, सैन्य व सामग्री हे युरोपात अडकलेले असताना त्याचा अचूक फायदा उठवित संग्राम उभा करणे यात गदर चे कौशल्य, क्षमता व महनियता दिसून येते.
’गदर’च्या १९१५ च्या संग्रामात सिंहाचा वाटा होता तो हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे यांचा. आजचा दिवस हा गदर क्रांतिकारकांच्या सर्व हुतात्म्यांचा स्मृतिदिन असल्याने केवळ हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे यांच्यावर न लिहिता या संग्रामाविषयी व हौतात्म्याविषयी लिहिणे अधिक समयोचित असले तरीही हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे यांचा या पर्वातील कामगिरी विषयक उल्लेख अपरिहार्यच आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला पण हिंदुस्थानातील विद्यार्थिदशेतच लो. टिळक, स्वा. स्वा. सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाने व कर्तृत्वाने प्रभावित झालेला हा क्रांतिकारक तिथेही आपल्या ध्येयाला विसरला नाही. हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे यांनी गदरच्या या प्रस्तावित संग्रामाला व्यापक स्वरुप देण्याचे व सुसूत्रता आणण्याचे मोलाचे कार्य केले. हिंदुस्थानातील युरोपिय देशातील काही विद्यार्थी जर्मनीत एकत्र आले व त्यांनी बर्लीन समितीची स्थापना केली. पुढे त्याचे रुपांतर हिंदुस्थान स्वातंत्र्य संघात झाले. याच सुमारास पिंगळे यांनी अमेरिकेते सॅन फ्रान्सिस्को येथील जर्मन परराष्ट्र कचेरीशी संपर्क साधला होता. या द्रष्ट्याने युद्धाचा सखोल विचार केला होता. त्यांनी अनेकांना युद्धशिक्षणासाठी प्रवृत्त केले. हुतात्मा सरदार अर्तारसिंग सराबा याना एका जर्मन कंपनीत विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले गेले. भाई उधमसिंग यांनी हॉंगकॉंग येथे तोफखान्यावर काम केले होते, त्यांनीअनेक सहकाऱ्यांना संतोकसिंग व ज्वालासिंग यांच्या शेतात अनेकांना त्याचे प्रशिक्षण दिले. स्वत: पिंगळे आणि हरनामसिंग हे स्फोटक उत्पादनाच्या मागे लागले. डॉ. खानखोजे हेही स्फोटकविद्येत पारंगत होते. एकदा स्फोटक निर्मितीचे प्रयोग करित असताना स्फोटकाने भरलेली लोखंडी नळी स्फोटाने फुटली व हरनामसिंग यांचा हात तुटला. पुढे ते हरनामसिंग तुंडा वा ’तुंडी लाट’ या नावाने प्रसिद्ध झाले.
सिंगापूरहून व्हॅंकुव्हर येथे शांघाय, योकोहामा, कोबे येथून रोजगारासाठी शिख मजुरांना घेउन जाण्यासाठी सिंगापूरचे व्यापारी बाबा गुरुदत्तसिंग यांनी नानंक स्टीम नॅव्हीगेशन या कंपनीची स्थापना करून तिच्या वतीने कोमागाटा मारू हे जहाज हाकारले. या जहाजाला कॅनडा सरकारने प्रवेश परवाना नाकारला (२३ मे १९१४) आणि बोट खोल समुद्रात उभी करायला लावली गेली. सुमारे दोन महिने गुरुदत्त यांच्या सरकारशी वाटघाटी सुरू होत्या. उतारू संतप्त झाले. याच सुमारास डॉ. खानखोजे व हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे हे देखिल व्हॅंकुव्हर येथे उपस्थित होते. साहजिकच बोटीतील उतरुंवर गदरचा प्रभाव पडला. प्रवाशांनी बंड करून जहाज ताब्यात घेतले. अखेर गुरुदत्त यांनी सरकारकडून प्रवासखर्च व नुकसानभरपाई वसूल केली व मगच (४ ऑगस्ट १९१४) परतीचा प्रवास सुरू केला. या उतारुंच्या लढ्याचे कौतुक करणारा लेख ’अमेरिकान गॅलिक’ या अमेरिकन पत्राने प्रसिद्ध केला. आता महायुद्ध सुरू झाले होते. या बोटीला सिंगापूर येथे प्रवासी उतरविण्यास मनाई केली गेली.
याच बोटीने उतारुंमार्फत शस्त्रे व दारुगोळा हिंदुस्थानात पाठविण्याचा बेत गदर ने आखला. ही कामगिरी भाई भगवानसिंग व हुतात्मा कर्तारसिंग यांच्यावर सोपविण्यात आली होती. ऑक्टोबर १९१४ मध्ये धोक्याचे इषारे व मित्रांचा परावृत्त करण्याचा प्रयत्न दूर सारून हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे हिंदुस्थानात येण्यास निघाले. महायुद्धात ब्रिटिश सरकार गुंतले असतानाच सिंगापूर ते हिंदुस्थान या पट्ट्यात लषकराच्या तुकड्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना सरकार विरुद्ध लढण्यास व सरकारचा हुकुम झुगारून देण्यास प्रवृत्त करण्याची ’गदर’ ची योजना होती. या कामासाठी युद्धकाळात हिंदुस्थानात शिल्लक असलेले इंग्रजी सैन्य, तोफखाना वगैरेची माहिती ’गदर’ ने गोळा केली होती. ब्रिटिशांचे सर्व सैन्य, शस्त्रे व लक्ष युरोपात केंद्रीत होत असतानाच इकडे हिंदुस्थानात त्यांची पकड ढिली होईल व नेमक्या त्याच संधीचा फायदा घेत आतून संग्रम उभारून शिपायांना सरकारविरुद्ध शस्त्र उगारयला लावून इंग्रजांना हा देश सोडायला लावायचा अशी ही ’गदर’ ची महत्वाकांक्षी व धाडसी योजना होती. हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे हिंदुस्थानात आले तेव्हा पोलिस मागावर होतेच. त्यांची गाठ इथे येताच राशबिहारी बाबुंशी पडली. आता कार्याला वेग येत होता. २१ फेब्रुवारी १९१५ हा दिवस सार्वत्रिक उठावासाठी निश्चित केला गेला. पंजाबात तर ’गदर’ ला प्रचंड प्रतिसाद लाभला. मोघ, छबा, फिरोजपूर येथे धनसंकलनार्थ दरोडे घातले गेले. पंजाबातले विद्यार्थी व शिख ठाणेदार ’गदर’ चा प्रसार कर्य लागले. सरकार ’गदर’ नेत्यांचा शोध घेत असतानाही हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे व क्रांतिमहर्षी राशबाबू वेष बदलून सर्रास पंजाबात फिरत होते, या दोघांवर सरकारने इनाम लावले होते.
नेहेमीप्रमाणेच फितुरीने घात केला. कृपालसिंग नावाच्या शिपायाने प्रथम सामील होत नंतर फितुरीने सर्व माहिती सरकारला दिली व अटकसत्र सुरू झाले. तरीही हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे वेष पालटून सर्वत्र फिरत पुन्हा नव्या बांधणीच्या प्रयत्नात जीवावर उदार होऊन फिरत होते. त्यांना मराठी व्यतिरिक्त पंजाबी, गुजराथी, बंगाली, हिंदी व इंग्रजी या भाषा उत्तम बोलता येत, त्यामुळे ते सफाइने सर्वत्र वावरत होते. क्रांतिमहर्षी राशबाबू तर हार्डिंग्ज हल्ला प्रकरणापासून सरकारला हवे होते. हुतात्म क्रांतिरत्न पिंगळे यांची तयारी इतकी जबरदस्त होती की त्यांनी पंजाबचे तत्कालीन गव्हर्नर मायकेल यांच्या शरिररक्षकांपैकी काही आपल्या कामगिरीसाठी फोडले होते. या कौशल्याची दाद नकळतच्ग ओडवायरही देउन गेला. एक प्रयत्न फसल्यावरही हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे खचले नाहीत. डोक्यावर टांगती तलवार मिरवत ते फिरत होते. त्यांनी नव्याने बॉंब जमा करून मीरतच्या घोडदळाशी संपर्क साधला व पुन्हा हल्ला करायचे ठरविले. दिल्ली येथील राशबाबूंच्या परिचयाचे दोन क्रांतिकारक रामलाल व शंकरलाल यांच्याशी पिंगळे यांची गाठ पडली व त्यांच्या सहाय्याने त्यांनी १८ अत्यंत शक्तिशाली बॉंब मिळवीले. मात्र एका अफगाण दफेदारावर ईशारा असतानाही केवळ स्वातंत्र्याच्या ध्यासापायी वेडे झालेल्या पिंगळे यांनी विश्वास ठेवला आणि ते बॉंब त्याच्या स्वाधीन केले. त्याच्या फितुरीने हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे मीरतच्या बाराव्या घोडदळाच्या वसहतीत पकडले गेले.
गदर्चा धसका घेतलेल्या व त्या क्रांतिकातकांचा भयानक तिरस्कार करणाऱ्य पंजाब गव्हर्नर ओडवायरने स्वातंत्र्य संग्राम चिरडण्यासाठी पकडलेल्या सर्वांवर ’झटपट’ पद्धतिने, विनापंच व पुनर्न्याची मुभा न देता ’विशेष अधिकार न्यायालयात’ खटला चालवावा यासाठी सरकारला लकडा लावला. त्या नीच माणसाच्या प्रयत्नाला जुलमी ब्रिटिश शासनाने यश दिले आणि ’लाहोर कटाचा अभियोग’ उभा राहिला; भारत संरक्षण निर्बंधान्वये उभा राहीलेला हा पहिलाच अभियोग. हा अभियोग सर्वार्थाने अभूतपूर्व होता.
आरोपींची संख्या ८१
पैकी ६२ न्यायालयात उपस्थित केले गेले, अनेक फरारी होते; पुढे काही पकडले गेले.
सर्वांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला
१९१५ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला अभियोग ऑगस्टच्या अखेरीस संपला
२४ जणांना फाशी तर सुमारे चाळीस जणांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली
पुढे या २४ पैकी बलवंतसिंग, हरनामसिंग तुंडा, हिरदाराम, जगतराम, केसरसिंग, खुशालसिंग, निघनसिंग, भाई परमानंद, पृथीसिंग, रामशरणदास, रुल्लियासिंग, सावनसिंग, सोहनसीम्ग, वसावासिंग इत्यादींची फाशी माफ करण्यात आली आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली.
दिनांक १६ नोव्हेंबर १९१५ रोजी गदर चे सात क्रांतिकारक आपल्या ध्येयाखातर निडरपणे व ताठ मानेने फासवर गेले. फाशी जायच्या एक अधिकारी हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे यांना म्हणाला की आम्ही तुम्हाला शक्य तितके दिवस जिवंत ठेवले. त्यावर पिंगळे उत्तरले "हा तर तुम्ही माझ्यावर घोर अन्याय केलात. कारण यामुळे या आधीच्या हुतात्म्यांचा माझ्यावरील विश्वास डळमळीत झाला असेल. शिवाय मला आधीच स्वर्गात जाउन माझ्या सहकाऱ्यांची सोय करायची होती"
जरी १९१५ च्या गदर संग्रामाला दुर्दैवाने यश लाभले नाही, तरीही पुढच्या अनेक संग्रामांची बीजे त्यात दिसून येतात. गदर च्या त्या सात हुतात्म्यांना सादर प्रणाम.