सुरळीची वडी

  • हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
  • पाऊण वाटी आंबट ताक, २ वाट्या पाणी
  • १ चमचा मैदा
  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (कमी तिखट असलेल्या)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • नारळाचा खव
  • किंचित लाल तिखट व हळद, चवीपुरते मीठ
  • किंचित साखर
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
१ तास
२ जण

वाटीभर तेलाची फोडणी करून घ्या. बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर आणि नारळाचा खव ३-४ वाट्या करा. त्यात चवीपुरते थोडे मीठ व थोडी साखर घाला.

डाळीचे पीठ, आंबट ताक, मैदा व पाणी एकत्र करून हाताने कालवावे. त्यात अगदी थोडे तिखट, हळद व चवीपुरते मीठ घाला.  पीठ कालवताना पीठाच्या छोट्या गुठळ्या होतात त्या हाताने पूर्णपणे मोडून काढा. नंतर हे एकसंध झालेले मिश्रण एका कढईत घालून  गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. कालथ्याने हे मिश्रण सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण शिजेल. शिजल्यावर त्यावर एक झाकण ठेवा व आच मंद करा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत सर्व मिश्रण एकसारखे करा. आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलेले असेल. गॅस मंद ठेवा.

५ मध्यम आकाराची स्टीलची ताटे उपडी करा व त्यावर प्रत्येकी थोडे मिश्रण घाला. एकावेळी एका ताटावर थोडेसे मिश्रण घालून त्यावर  थोडे तेल लावलेला प्लॅस्टीकचा पसरट कागद ठेवून अगदी हलक्या हाताने लाटण्याने लाटा. सर्वबाजूने एकसारखे पातळ लाटा. याप्रमाणे ५ ताटे करून घ्या. मिश्रण गरम असतानाच लाटले जाते म्हणून एका वेळी एक ताट. तोवर बाकीचे मिश्रण कढईतच ठेवा मंद आच करून.

आता सुरीने उभे कापून पट्ट्या पाडाव्या. नंतर त्यावर मिरच्या कोथिंबीर व नारळाचा खव सर्व बाजूने घाला. शिवाय तयार केलेली फोडणीही घाला. प्रत्येक पट्टी अलगद हाताने गुंडाळी करून एक गोल वळकटी करा. वळकटीसारख्या गोल केलेल्या वड्या म्हणजेच सुरळीच्या वड्या.

सुरळीची वडी आणि सोबत  आले घालून केलेला गरम चहा!

सौ आई