जागो मतदार प्यारे

आल्या आल्या निवडणूका
जागा हो मतदारा
आश्वासनं अन सुविधांच्या
बरसतात बघ धारा

अनेक व्यक्ती अनेक पक्ष
जनतेकडे ना कुणाचे लक्ष
सत्ता, पैसा अन खुर्ची
मिळविण्या करीती मखलाशी

शिवसेनेचा शिववडापाव अन
काँग्रेसचे कांदे-पोहे
भ्रमिष्ट झाली जनता आता
खावे काय हा प्रश्न पडे

शिवसेनेचा प्रचार मोठा
ठरविण्यास तो बर्गर खोटा
बरीच वर्ष दुर्लक्षित होता
भाव येई एकदम आता

बघून सेनेची युक्ती
काँग्रेस काढे नवीन क्लूप्ती
वडापाव तर रोजचाच आहे
आम्ही आणतो कांदे-पोहे

मैदानात घेतली उडी
करण्या आता कुरघोडी
बघता यांचे माकडचाळे
जनता ही झाली वेडी

म्हणून म्हणतो मतदारा
आता तरी हो जागा
मतदानाचा हक्क बजावून
दाखवून दे यांना 'जागा'