(मुंबई मधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शेकडो निष्पाप जीवांना आणि अतुलनीय शोर्य दाखवत अतिरेक्यांचा सामना केलेल्या मुंबई पोलिस आणि लष्करी जवानांना सादर अर्पण.)
सागराच्या कवेमधे, सुंदरसे एक शहर वसे;
येई त्यास सामावून घेई, सर्वदूर ही ख्याती असे.
मायानगरी म्हणती त्याला, लक्ष्मीचे वरदान जसे;
वेगवान हे जीवन इथले, आरामाला स्थान नसे. ॥१॥
ऐश्वर्याला परि त्याच्या, एक भयानक शाप असे;
दहशतवादाचा भुजंग, त्यासी विळखा मारून बसे.
रक्ताचे पडतात सडे, अन मुडदयांचे उठतात ठसे;
भय हे इथले संपत नाही, म्रुत्युचे थैमान दिसे. ||2||
एके दिवशी विनाश करण्या, शहरामधे सैतान घुसे;
रक्षण करण्या जनतेचे सैन्य आमुचे सज्ज असे.
शूरवीर ते लढले ऐसे, शिवबाचे मावळे जसे;
उपकारांचे अपार त्यांच्या, कर्ज तरी फिटणार कसे ? ||3||
पुन्हा, पुन्हा हे घडते येथे, यात कुणाचा दोष असे ?
नेत्यांच्या भूलथापांना, जनता आता मुळी न फसे.
शेकडोंनी प्राण गमविले, नुकसान हे भरणार कसे?
म्रुतात्म्यांना शांती मिळो, हेच ईश्वर चरणी नमन असे. ||4||