कुऱ्हाडीचा दांडा , गोतास काळ
माणसाचा अंतकाळ , माणूसच आहे
माणसांची संख्या , वाढे बेसुमार
भुइसी भार , वाढतसे
वाढत्या प्रजेने , तोडीयले झाड
जाहले उजाड , डोंगरमाथे
बोडके डोंगर , गेलासे पाऊस
जाहली भकास , माळराने
येता दुष्काळ , पाण्याची भ्रांत
कोस पादक्रांत , घोटासाठी
नाही जलस्त्रोत , विजेची कपात
घोर अंधारात , काढावी रात्र
वाढली वाहने , वाढले प्रदुषण
आजारासी आवतणं , आयतेच
कोणा होई सर्दी , कोणा होई दमा
नाही याची तमा , कोणालागी
वाढले प्रदूषण , वाढले तापमान
कमी आयष्यमान , झाले जीवसृष्टीचे
हरीश दांगट