आकांत

माझ्या रक्तातील एक पेशी
आत्ताच मेली
अन केला एकच आकांत
तिच्या भोवती, तिला चिकटून असलेल्या
सहा पेशींनी...

सांधून घेतलीच
थोड्या वेळाने सगळ्यांनी
आपापली उसवलेली आवरणे
पुन्हा

आणि म्हणाली त्यातलीच एक
बरे झाले!
आता आपल्या वाढीसाठी
जागा तरी झाली!!
आणि नाहीतरी तीच होती
हृदयाची लाडकी
अन तिलाच मिळायचा प्राणवायू
सगळ्यात जास्त...

माझ्या रक्तातील एक पेशी
आत्ताच मेली.