कुठलीही मर्यादा , अंत , परिसमाप्त्ती स्वतःच्या अनुभवाला,बुद्धीला नसवी
अशी सुप्त आकांक्षा प्रत्येक जीवात असते.
'अनंततेच्या' चिंतनाने मर्यादा शिथील होतात , 'च' च्या ऐवजी 'सुद्धा' हा प्रयोग संभवू लागतो
एखादी व्यक्तीच किंवा वस्तुच असणे आवश्यक वाटत नाही, दुसरी सुद्धा तितकीच मुल्यवान असू शकते,
हे वाटू लागते...... अनंतता म्हणजेच ईश्वराचे स्फुरण !
__________महर्षी न्यायरत्न विनोद
.....'अनंतता'.....
ध्वनिमया भव्य ही, विश्ववीणा वाजे
अभंग हे उसासे , तियेचेच
पक्षी समुद्र हे, तसे वेडे वारे
गुंगती ना सारे, गीत गाता
तसाच गातो मी, मला का हासता
नसे माझी सत्ता, इथे काही
एखादे वेड , जे वाढवावे चित्ती
तयानेच शांती, मिळे जगी
अनंतते, मला तुझे लागे खूळ
शरीर देउळ, तुझे झाले...
वारुळाची वाट मुंगीला ठाउक
हळूहळू एक, पाय टाकी
मीही जन्मांतरी , माझिया वारुळा
जाईन राऊळा , अनंतेच्या....
उशाखाली माझ्या , कालाचा गालिचा
मुखा मध्ये ऋचा , अनंतेची
अस्तित्व-रत्ने ही पाहा सभोवती
जणू लकाकती, आत्मतेजे
कैवल्यगंगा ही , सर्वत्र वाहते
विश्व हे नहाते , ब्रम्हानंदे !
पहीला प्रकाश, त्या क्षणापासुनी
दुजी इच्छा मनी, आली नाही
जीविताचे व्हावे, लहानसे फूल
पूजिण्या पाउल. तुझे देवा !
विश्वाचा मी सूर , संचरे सर्वत्र
सत्यार्थ फेकीत , सर्व ठायी
जीवितात माझ्या, विश्वात्मा संस्फुरे
श्वासात संचरे, अनंतत्व.....
--------न्यायरत्न महर्षी विनोद