मुक्तक आणि मुक्तछंद

मुक्तक आणि मुक्तछंद

कवितांच्या विभागात उपविभाग तयार करताना मुक्तक आणि मुक्तछंद या दोन काव्यप्रकारांबाबत येथे (मनोगत) काहीतरी घोटाळा झालेला आहे का???. (या विषयावर लिहिण्याला उत्पल यांची काही दिवसांपूर्वीच सादर झालेली 'घोडा' ही 'मुक्त' कविता आणि त्यांचाच उपप्रतिसाद निमित्त ठरला. )  यापूर्वीही अनेकांनी येथे मुक्तछंद कविता ही मुक्तक या विभागात लिहिल्याचे आढळून आले आहे. त्या त्या वेळी या विषयावर लिहायचे, असे ठरवत होतो. पण वेळ मिळत नव्हता. योग येत नव्हता. आज लिहीत आहे.
................

१) मुक्तक म्हणजे -  चार ओळींची कविता. (पण चारोळी मात्र नव्हेच नव्हे) 
मुक्तकात पहिली, दुसरी आणि चौथी अशा तीन ओळी सयमक / सअंत्ययमक असतात.
तिसरी ओळ सयमक / सअंत्ययमक नसते. मुक्तकाचे एक उदाहरण पाहा -  

कविता देते फक्त दिलासा... बाकी काही नाही!
विरंगुळा जगण्यात जरासा... बाकी काही नाही!
कविता लिहिली म्हणून झाले जगणे हलके थोडे...
हा माझा इतकाच खुलासा... बाकी काही नाही!

[ (अस्मादिकांचे १०-१२ वर्षांपूर्वीचे मुक्तक :) ]

............................

२) मुक्तछंद या काव्यप्रकाराची नव्याने ओळख करून देण्याची काही आवश्यकता आहे, असे वाटत नाही. उत्पल यांची 'घोडा' ही कविता याच काव्यप्रकारात मोडण्यासाऱखी  आहे... पण त्यांच्या कवितेचे शीर्षकच 'घोडा' असे असल्याने ती कविता (आकाराच्या हिशेबाने) खूपच स्वैर  उधळणारी वाटते... :) येथे हे नमूद करायला हवे की, उत्पल यांची ही कविता मला खूप आवडलेली आहे. या चर्चेसाठी त्यांची ही कविता केवळ निमित्तमात्र ठरलेली आहे, हे त्यांनी कृपया ध्यानी घ्यावे. त्यांच्या कवितेच्या लांबीवर या चर्चेचा मुळीचच रोख नाही. मुख्य मुद्दा आहे तो कविता या विभागात मुक्तक आणि मुक्तछंद हे दोन उपविभाग करताना होऊन गेलेल्या घोटाळ्याचा.
मुक्तछंद या काव्यप्रकाराच्या नावातच त्याचे 'स्वरूप ' दडलेले असते, हे जरी खरे असले; तरी पण त्या स्वरूपाचा एवढा मोठा विस्तार असावा की नाही, हे ज्या त्या कवीने ठरवलेले बरे... त्याचा तो अधिकार अबाधित राहावा. अनेकपानी मुक्तछंद कविताही यापूर्वी वाचनात आलेल्या आहेत.[ (दोन-दोनपानी मुक्तछंद कविता लिहिलेल्यालाही आहेत;  पण उगाच कशाला वाचकाची छळणूक करा :) ]  मुक्तछंदाच्या आकृतिबंधाला तसा काही नियम लावता येईल, असे वाटत नाही. पण मुक्तछंद कविता ही नेमकी, मोजकी, आटोपशीर असावी, एवढे मात्र खरे. तिच्यातही लय, नाद, प्रासादिकता असेल तर अत्युत्तमच. छंदोबद्ध काव्याचे हे विशेष तीत असलेच पाहिजेत, असा दंडक मात्र नाही.

या काव्यप्रकारातील माझ्याही एका कवितेचे उदाहरण देऊ का...? देतोच. :)

....................................
पाऊस... निरोपानंतरचा!
....................................

ढग दाटायला सुरुवात झाली होती
तुझ्याशी बोलत असताना...
आकाश चोहोकडून अगदी भरून आलं होतं
तुझं-माझं बोलणं संपायच्या आसपास...
आता अगदी कोसळायलाच लागणार असंच वाटत होतं;
तुझा निरोप घेत असताना...!
आणि तसंच झालं...
उंबऱ्यातून बाहेर पडल्यावर चार-पाचंच पावलांवर
सुरवात झाली धुऔंधार
बाहेरही.... अन मनातही!!
....
माघारी फिरण्याबाबत
तुझी अस्पष्टशी हाकही ऐकू आली असावी का कदाचित...? कदाचित नव्हे; आलीच!  
पण मी पुन्हा वळणं शक्यच नव्हतं....
एकाच वेळी मी कसा काय झेलू शकणार होतो...
पाउस...
बाहेरचा...!
माझ्या मनातला...!!
अन्
तुझ्या डोळ्यांतलाही!!!

(रचनाकाल ः २५ जुलै १९९८)
.........

तेव्हा प्रशासकांना विनंती की, मुक्तछंदातील कविता 'मुक्तक' या उपविभागाखाली न आणता त्यासाठी 'मुक्तछंद' असा स्वतंत्र विभाग केल्यास बरे होईल. म्हणजे मग या दोन स्वतंत्र काव्यप्रकारांची अशी सरमिसळ होणार नाही. येथे मुक्तछंद हा उपविभागच नसल्याने उत्पल यांना त्यांची ही कविता मुक्तक या उपविभागात नाइलाजाने हलवावी लागली असणार.
ज्याला चार ओळींचे मुक्तक (वरीलप्रमाणे) सुचेल तो, ते 'मुक्तक' या विभागात ते सादर करू शकेल आणि ज्याला मुक्तछंद कविता सुचेल, तो (नव्याने तयार केले गेल्यास) मुक्तछंद या विभागात तशा कविता सादर करू शकेल. कविता या विभागात हा आणखी एक उपविभाग सहज करता येऊ शकेल, असे वाटते.

धन्यवाद.