विसंगतींचे संदर्भ...!

कळून इतके काय कळे हे
नकळे मजला का न कळे
ज्याच्या त्याच्या संदर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!

भास भाबडे रंग रूप हे
भास भावना भास चेतना,
भास सत्य अन भास भासही
भास असे सगळे सगळे...
ज्याच्या त्याच्या संदर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!

समजून घेतो आपण आपले
सगळे आपल्यासाठी इथे..
आपण कोण नि कोण दुजे हे
परंतु येथे कोणा न कळे..
ज्याच्या त्याच्या संदर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!

भूल दिशा अन दिवस निशा हे
पोकळ जडता स्थिर चल हे..
अंत अनंत नि क्षणिक चिरंतन
व्यक्ताशी अव्यक्त जुळे....
ज्याच्या त्याच्या संदर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!

- हृषीकेश कुलकर्णी