जुन्या-जाणत्यांजुन्याआपल्या जीवनात कित्येक गोष्टी आपण नित्य स्वरुपाच्या आहेत. रोज सूर्य पुर्वेस उगवतो, व पश्चिमेस मावळतो. आपण ठराविक वेळी आपापल्या कामास जातो. नेमक्या ठरल्यावेळी ठराविक बस नेहमीच्या थांब्यावर येते. सारे काही नियमित!
पण यातच अनियमितता, अनिश्चितता देखील दडलेली आहे. कधी कोणत्या गोष्टीस समोरे जावे लागेल, याचा नेम नसतो. या अनिश्चिततेमुळेच धोके संभवतात. "चालू क्षणावर अधिकार माझा, पुढीलाचा भरवसा कोणी द्यावा?"
या धोक्यांविषयी आगोदर काही सांगता येत नसते. भलेभले ज्योतिषी सुद्धा हात टेकतात.
पण तरी ही माणसे काही योजना आखतात व त्या पार ही पाडतात. त्या साठी त्यांच्या गाठीशी असतो अनुभव. अनुभवांच्या आधारे आपण अडाखे बांधत सतत पुढे जात असतो. हे अनुभव म्हणजे इतिहास असतो. स्वानुभव तर असतोच! पण इतरांच्या अनुभवांची शिदोरी ही सोबत असते. सगळेच अनुभव स्वतः घ्यायचे ठरवले तर आयुष्य पुरणार नाही! पुर्वसूरींनी त्यांचे जे अनुभव लिहून ठेवले नियम झाले, पद्धती झाल्या. आम्ही त्यांचे ऋणी रहायलाच हवे. पण हे ही तितकेच खरे, त्यांचे अनुभव त्यांच्या बरोबर! आज ती परिस्थिती पार बदललेली असेल. तेव्हा केवळ 'बाबा वाक्यम प्रमाणम' कामाचे नाही! सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर 'कालचा स्वयंपाक चांगला होता म्हणून तोच आज ही चांगला म्हणायाचे काय? आज तो बिघडलाही असेल'
थोडक्यात गोष्टी तपासून घ्यायला हव्यात.
केवळ नियमांवर बोट ठेवून, धोका नको म्हणून घाबरून राहायला लागलो तर कोणताही व्यवसाय यशस्वी होणार नाही. नफा दिसणार नाही. धोका पत्करण्याचे बक्षिस म्हणजेच नफा होय. नफ्याची गोष्ट सोडा! घरी बसून राहिले तरी धोका संभवतोच! म्हणूनच धोक्याला घाबरून चालणार नाही. त्याला सामोरे जायला हवे. पण नियमांच्या, पुस्तकांच्या अभ्यासाने धोक्यांचा अंदाज येतो. हे धोके कसे टाळता येतील ते समजते. टेबलावरून उडी आपण आरामात मारू! दहाव्या मजल्या वरून....? त्या दोन्हीतील फरक पुस्तके सांगतात. यालाच धोक्यांचे पुर्वाकलन म्हंणता येईल!
या नियमांचे अर्थ चालू परिस्थितीच्या संदर्भात अभ्यासायला हवेत. नियम सांगतो, 'चुलीवरचे पातेले हाताने उतरवू नका, हात भाजेल! ' पण चूलीखाली जाळ आहे का ते तरी पहाल? हां, हे खरे, आत्ता या क्षणी चूली खाली जाळ नसेलही, पण तरीही पातेले अद्याप गरम असू शकेल, हात भाजू शकतो,आपली कृती तपासायला हवी!
सारेचजण नियमानुसार चालू लागले, तर नवे काहीच घडणार नाही! नवे घडवायचे असेल, तर धोके पत्करून पुढे जायला हवे. आणि हे धोके पत्करण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये (ते अनुनभवी असल्याने) अधिक असते. त्यांना धोके पत्करू द्या! फक्त त्यांनी देखील, जुन्या-जाणत्यांशी आगोदर विचार विनिमय केल्यास, धोक्यांच्या परिणामांची तीव्रता काही अंशी कमी होऊ शकेल.
ते नवे अनुभव लिहतील, नवीन नियम तयार होतील; नव्या वाटा रूढ होतील या साऱ्यांचे स्वागतच करायला हवे!
'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा जाऊ नको' असेच माझे तरुणांना आवाहन असेल!