एका रानवेड्याची शोधयात्रा

कृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी.....! खऱ्याखुऱ्या  जंगलपुत्रासारखं राहून.... जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय.

"काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात" असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती.... आणि झालंही तसंच  ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या ह्या "कृ्ष्णमेघा"ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना... की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही.

अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा! आता हे बघा.....

पण फक्त त्या पळसाकडेच इतरांच्या नजरेला वेड लावायचा मक्ता नव्हता. पिवळ्या मोहरात आंधळं करणारं सोनं घेऊन झुकलेला बहावा, टपोऱ्या लाल फुलांचे मधुरसाचे कुंभ घेऊन उभ्या ठाकलेल्या काटेसावरी, ठिणगीलाही फिक्कं पाडेल अशा रक्त-लालीच्या फुलांचे शिरपेच ल्यालेले पांगारे.. हे सारेच खांद्याला खांदे लावून उभे होते. मोयार गॉर्जच्या कपाळावर गर्दी केलेल्या बांबूची पानं सोनपिवळी पडली होती. वाऱ्याच्या हळूच स्पर्शाबरोबर ती थरारून कापायची. सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी डोंगरामागून बांबूच्या बेटाशी सलगी केली की मागच्या काळ्याशार कातळाच्या पार्श्वभूमीवर ही पानं कशी लकाकायची! काय तो उठाव!

जागोजागी ही अशी शब्दालंकारांची उधळण....!! आपण इतकं तॄप्त होतो ना हे सगळं वाचताना.... अनुभवताना.....!! प्रेमात पडल्याशिवाय शब्दांची अशी कशिदाकारी होऊच शकत नाही. लेखक सबंध एक ऋतूचक्र जंगलात उपभोगून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ऋतूमधला जंगलाचा साज अतिशय कलात्मकतेनी आणि आत्मियतेनी चितारलाय. त्यांच्या अनुभवात प्रचंड थरार आहे, जो वाचक अनुभवू शकतो. हे त्यांचं कथन म्हणजे, जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं "मदुमलाई सूक्त"! जे हातून निसटलं त्याची हुरहुर लेखकाला होते.. तश्शीच वाचकालाही जाणवते.

पुस्तक उघडल्याबरोबर जाणवतं ते पुस्तकाचं देखणेपण!! गुळगुळीत, चकचकीत वेष्टनात गुंडाळलेलं गिफ़्ट उघडताना जसं वाटतं ना.... तसं वाटतं हे पुस्तक उघडताना! जिवंत चित्रं, मखमली पानं आणि जंगलातला थरार..... नितळ पारदर्शी लिखाण........ अहा..... मजा आ गया!!

अगदी वाचून अनुभवायलाच हवं असं पुस्तक!!