बाजीरावाचे मनोगत

बाजीराव विश्वनाथ हा दुसरा पेशवा! महापराक्रमी! सारी दक्षिण आणि उत्तर त्यांनी आपल्या पराक्रमाने दणाणून सोडली होती. पण त्या काळच्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्याने ब्राह्मण्य सोडले म्हणून फार छळले! त्याला अनुलक्षून-

"संध्या स्नाना सदा विसरला,

ब्राह्मणात हा उगा जन्मला"

ऐसे कोणी खुशाल बोला!

चिंता त्याची नाही मजला!!

स्नान जाहले रिपु-रक्ताने,

पुन्हा कशाला हवे निराळे?

अरि-मुंडांचे घडता मर्दन,

कोण पुसतसे संध्या-पुजन?

देवमंदिरी मी नच गेलो,

किर्तनात वा कधी रंगलो,

रणक्षेत्रातच माझे नर्तन

इश-जपाचे ते आवर्तन!

रणात होता पुर्वज तर्पण,

तीर्थांची ना मला आठवण!

शस्स्त्रासंगे नित्य अर्चना!

कोण श्रवतसे व्यर्थ प्रवचना!

भटातला मी, भटावेगळा,

विचित्र-प्राणी तुम्हा वाटला!

गर्व बाळगा हिंदुत्वाचा,

फुका कशाला ब्राह्मण्याचा?

-----------------------

रिपू - शत्रू

अरी - शत्रू

आवर्तन - वारंवार

पुर्वज-तर्पण- पुर्वजांचे श्राद्ध

'भटातला मी'.. पेशव्यांचे मूळ आडनाव 'भट' होते. भट या शब्दाचा एक अर्थ ब्राह्मण असा आहे, तर दुसरा अर्थ रण गाजविणारा वीर योद्धा असा ही आहे.