मित्रांनो, ही कविता माझ्या आईने रचलेली आहे. कालगंगा वृत्तात बसवण्यासाठी मी काही किरकोळ बदल केले आहेत. एखाद्या कवी मित्राच्या आईची कविता आहे अशा दृष्टीने न पाहता निष्पक्षपणे ही कविता पाहिली जावी अशी विनंती.
श्रद्धांजली - कामटे, साळसकर आणि करकरे
काय गर्दी अन स्मशानाची इथे ही शांतता
हार हाती वाहण्या आणी न हृदयी शांतता
रांग ही सरके पुढे त्या वीरपुत्रा पाहण्या
धीर देण्याचाच हेतू, क्रूर धक्का साहण्या
आतले वातावरण गंभीर, दुःखी, कुंद का?
शांततेला फोडणारा हा कुणाचा हुंदका?
दुःख पत्नीला, तिची सोडून सोबत चालला
सावरा आईस कोणी, जीव त्यांचा हालला
शूर होता वीर चिरनिद्रेमध्ये जो झोपला
कालवर शत्रूवरी हा काय होता कोपला!
पाहता हा वीरमृत्यू लोक झाले स्तब्द्धसे
काय बोलावे कळेना मूक झाले शब्दसे
राक्षसी निर्लज्ज शत्रू फार आता मातला
भूमिपुत्राच्यावरी त्यानेच घाला घातला
नेत्र काठोकाठ भरले, ओठ सर्वांचे सुके
पार्थिवा पाहून साऱ्यांची इथे गर्दन झुके
सौ. सुमित्रा कटककर - ०२० - २५२८०३८७