सौभाग्यकांक्षिणी माझी ही कन्या....!

सौभाग्यकांक्षिणी माझी ही कन्या,

निघाली सत्त्वरी सासरी जाण्या!

सद्गुणी देखणा, अनुरुपसा,

प्रिय तिचा हा, दारी ठाकला!

ओढ लागली, नव्या घराची,

स्वस्थता कैसी, मग जिवाची?

बोल बोबडे, तान्ह्या बाळीचे,

घुमती कानात, अजूनी कैसे?

हादगा असो वा, गाण्यांच्या भेंड्या,

सदा अग्रेसर, माझीच बाला!

वक्तृत्व फुलावे, हिच्या अंतरी,

जिंकाव्या सभा कितीदा तरी!

वाचन- मनन-चिंतन-लेखन,

गुणांच्या विकासी नाहीच वाण!

शालीन तरीही आत्माभिमानी,

फुलले कमळ सर्व दिशांनी!

हासरा चेहरा, बोलके ओठ!

सामोरी दिसता, दाटतो कंठ!

भविष्य उज्वल असावे हिचे,

याविन काय बोलू मी वाचे?