एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात अनेकविध समाज-सुधारक होऊन गेले. विनायक दामोदर सावरकर त्यापैकीच एक. "हिंदू हिंदू सकल बंधू"चा नारा देत त्यांनी सर्व हिंदूंना सर्व जाती जमाती विसरून एक होण्याचे आवाहन केले. ते केवळ वाचावीर नव्हते तर त्यांनी आपल्या कृतीने प्रत्यक्ष धडे ही घालून दिले. "माझी समुद्रात मारलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे विचार विसरू नका" असा त्यांचा आग्रह होता.
परंतु नेमके नको तेच झाले. लोकांनी त्यांना स्वातंत्र्यवीर पदवी दिली, पण त्यांच्या विचारांचे अनुकरण केले नाही. सावरकरांनी आपल्या अनेक लेखातून, नाटकांतून, कथांतून विज्ञानवादाचा पुरस्कार केला. मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल की नरक, याच्या चिंतेत न पडता या जन्मावर लक्ष केंद्रीत करा, सदैव अद्ययावत रहा; शस्त्रसज्ज रहा, दुसऱ्यावर आपण अन्याय करू नये, हल्ला करू नये, पण स्वतःवर अन्याय होणार नाही खातरजमा करावी, हे ते सांगत राहिले. "आम्ही हिंसाचारी नाही, हवे तर शस्त्राचारी म्हणा" असे ते ठणकावून सांगत.
सावरकारांनी मांडलेली हिंदुत्वाची व्याख्या धार्मिक नव्हती; राजकीय होती. राज्यघटनेने नेमकी तीच मान्य केली आहे. यात सावरकरांचे द्रष्टेपण दिसते. ते हिंदूंच्या धार्मिक पुनरुत्थानाबद्दल कधीच बोलले नाहीत. हिंदू जातीच्या प्रगती संबंधात त्यांनी विचार मांडले होते. हिंदू समाजातील अनेक दोषांवर त्यांनी नेमके बोट ठेवत त्यात सुधारणा घडवण्यासाठी जिवाचे रान केले.
अकारण मुस्लीम-विरोध देखील त्यांना अभिप्रेत नव्हता. पण त्याच वेळी त्यांचे लांगुलचालन ही त्यांना मान्य नव्हते. "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" हे तुकाराम वचनच त्यांच्या विचारांचा पाया होता.
सामर्थ्यशाली भारताचेच स्वप्न त्यांनी सतत पाहिले. सीमा आधी संरक्षित करा, आणि मग संपत्ती निर्माण करा! हा त्यांचा संदेश होता.
भारातातील नवी पिढी तरी समग्र सावरकर समजावून घेईल आणि सावरकरांचा स्वप्नातील समर्थ भारत साकार करेल अस विश्वास बाळगू या!
(काही भाग संपादित : प्रशासक)