एकनिष्ठ पतीपत्नी...

पत्नी - तुम्ही सारखे का तिला पाहता हो?
       मला चाहता की तिला चाहता हो?

पती - प्रिये तूच माझी खरी एक राणी
       तिचा मी नसे, तीच माझी दिवाणी

पत्नी - तिला लाज नाही, तुम्ही लाज ठेवा
       मिळे मुफ्त ऐसा बरा नाहि मेवा

पती - नसे मुफ्त ती, दागिना घेतला मी
       स्वतःच्याच हस्ते तिला घातला मी

पत्नी - सुधारा, जरा लाज ठेवा मनाची
        तुम्हा घालते आण माझ्या गळ्याची

पती - गळ्यातील हे आज तू घातलेले
       मला भासते मी तिला आणलेले

पत्नी - तुम्ही घालवावेत नी आणते मी
       तुम्हाहून रीती बऱ्या जाणते मी

पती - अरे बापरे, ती तुला भेटली का?
       अरे इज्जतीची चिता पेटली का?

पत्नी - पती भेटतो त्या बयेचा मलाही
       म्हणे घालतो दागिना मी तुलाही