कुणास्तव कुणी तरी..... कवी नारायण वामन टिळक

मला आवडलेली एक कविता रसिकांसाठी सादर करित आहे. कविता प्रख्यात कवी ना. वा. टिळकांची आहे. कोसळत्या पावसात कुटुंबवत्सल माणसांची अवस्था कशी असू शकेल याचे सुंदर वर्णन यात आढळते.

सरोष घन वर्षती, तरुलतांशि वारा झुजे,

विराम नच ठाउका क्षणही नाचताना विजे;

भयानकचि संचरे सकल सृष्टि हो घाबरी

कुणास्तव कुणी तरी सभय वाट पाहे घरी!

रवप्रतिरवामुळे बधिर जीव सारे जरी;

निनाद करिते अहा! श्रवण चाहुलीचा तरी;

उठे दचकुनी तडित दुसरी नर्तनाला करी,

कुणास्तव कुणी तरी कितिक येरझारा करी!

खुशाल कर वृष्टीला, तुज न तो भिणारा घना!

पिशाचासम तू खुशाल कर गे विजे नर्तना!

महिधर समिरणा! धरुनी लोळवी भूवरी,

कुणास्तव कुणी तरी निघत यावयाला घरी!

घनप्रसर माजला, नभी न एक तारा दिसे,

परंतु हसरा सदा सुखद चंद्र गेही वसे;

अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकांताप्रती!

कुणास बघुनी कुणी तरी हसेल हर्षे किती?

अहा चरणधावना कलशपूर्ण उष्णोदके,

रुचिप्रद वरान्न जे करिल हो सुधेला फिके!

फुलांहूनि मऊ असे शयन रम्य मंचावरी

कुणास्तव कुणी तरी घरी अशी तयारी करी

रसाळ वचनावली विविध तोंडि लावावया,

मिळेल, उपमा उरे न मग भोजनाला तया!

पडेल मग विस्मृती सकलही श्रमांची क्षणी,

कुणाप्रती कुणी तरी निरिखता प्रसन्नेक्षणी!

तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला,

सदा सुखद भोवरा विहरण्यास ऐशा मुला

बळेच उठवी कुणी! उभयतांस आलिंगुनी

कुणी तरि धरील तैं विषय अन्य कैंचा मनी!

तमास अपसारुनी उन पडेल त्या मंदिरी,

तशात पडतील हो मधून पावसाच्या सरी,

कुणी तरि धरोनिया कर करी कुणाचा तरी

स्तवील परमेश्वरा जलद, सूर्य ज्याचा करी!

-----------

कठीण शब्दांचा /ओळींचा अर्थ-

सरोष-  (रोष- रुसवा) - रागा-रागाने (येथे अतिशय जोरात)       विराम - विश्रांती   

भयानकचि  संचरे- वातावरण भीती दायक आहे.

सभय- भीतीयुक्त    रवप्रतिरव -रव-म्हणजे ध्वनी प्रतिरव- प्रतिध्वनी     बधिर-काही कळत नाहीसे होणे

  निनाद - आवाज  श्रवण - ऐकणे (चाहुलीचा आवाज ऐकते)

तडित- आकाशातील वीज, नर्तन- नाच

घना! - हे ढगा!      

महिधर - पृथ्वीला धारण करणारा (शेषनाग)      समीरण - वारा ' हे वाऱ्या, तू शेषनागाला सुद्धा भूमीवर लोळवित आहेस!' ( इतका सोसाट्याचा वारा आहे)

"तुज न तो भिणारा " - पडत्या पावसातही घरी कोणी तरी वाट पहात असल्यामुळे, जाणारा जो कोणी तो!

घनप्रसर- दाट ढगांचा पसारा       गेही - घरी

"अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकांताप्रती"- चंद्रकांत मणी चंद्रप्रकाशात विरघळतो, असा कवी-संकेत आहे.  घरात वाट पाहणारा 'चंद्र', (भर पावसातही) घरी जाणाऱ्यास असाच प्रेमाने विरघळवून टाकेल.

चरणधावना- पाय धुण्यासाठी     कलश - घागर किंवा तांब्या    उष्णोदके- गरम पाण्याने भरलेला.

"रुचिप्रद वरान्न जे करिल हो सुधेला फिके"  सुधा म्हणजे अमृत. अमृताला फिके पाडणारे रुचकर अन्न!

शयन- झोपण्याची व्यवस्था     मंच- पलंग

रसाळ वचनावली- मधूर भाषा     

तमास अपसारुनी - तम- अंधार अपसारुनी- बाजूला करून

"तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला,

सदा सुखद भोवरा विहरण्यास ऐशा मुला

बळेच उठवी कुणी! उभयतांस आलिंगुनी" - या ओळींचा अर्थ नीटसा मला उमगला नाही. कोणी उलगडून दाखवेल काय?

"कुणी तरी धरोनिया कर करी कुणाचा तरी" - एकमेकांचा हात हातात घेऊन

जलद - ढग

"जलद, सूर्य ज्याच्या करी" - सूर्य व ढग ज्याच्या करी( हातात - ताब्यात) आहेत त्या परमेश्वराला स्मरतील.