कथा 'सचिन' ची...

कथा. निश्चित अशी सुरुवात, निश्चित असा अंत. कथाकाराची कल्पना, कधी मर्यादित तर कधी अमर्यादित. कधी सत्यकथा. शेवटी कथा ही कथाच. जसा कथेचा(क्षणिक अंत) तसा कथाकाराचाही अंत ठरलेला. कथाकार काळाच्या गर्तेत खोलवर हरवतो पण कथा मात्र अजरामर होते. कुणा एका त्या 'निर्मिकाच्या' असंख्य कथांमध्ये, असंख्य कलाकार काम करतात आणि त्याला 'जीवन' असं नाव देतात. त्या निर्मिकाने लिहिलेल्या असंख्य कथांमधलीच ही एक, कथा 'सचिन' ची.

ही कथा कुणा एका व्यक्तीची म्हणणं फारच चुकीचे ठरेल, खऱ्या अर्थाने ही 'सचिन' नावाच्या वृत्तीचीच कथा म्हणावी लागेल. भारत देशाच्या कुठल्याश्या खेडेगावात, कुणा सुइणीच्या मदतीने, गरीब कुटुंबात, 'सचिन' जन्माला येतो. निसर्गाच्या 'खऱ्याखुऱ्या' सानिद्ध्यात, रानावनात, फुला-पाखरांत 'सचिन' आपलं बालपण, आनंदाने जगतो. 'सचिन' ६ वर्षाचा होताच, ५०० ते १००० हजार लोकसंखेच्या कुठल्याश्या खेड्यात, त्याचं १ ली त नाव दाखल केलं जातं. आणि मग लढा सुरू होतो, परिस्थिती-गरिबीपुढे हतबल झालेले मायबाप, तोडकी-मोडकी शिक्षणाची साधने व जुन्या 'अंधश्रद्धेने' बरबटलेले 'रुढी-परंपरागत विचार विरुद्ध, 'शिकण्याची आस', 'परिस्थिती बदलण्याची इच्छाशक्ती', मनुष्य' जीवन काय आहे हे जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. मग खऱ्या अर्थाने सुरुवात सुरुवात होते, 'सचिन' नावाच्या वृत्तीच्या कथेची. 'सचिन अत्तरदे' हे त्या वृत्तीचं क्षणिक नाव.

जळगाव जिल्ह्यातील, धरणगाव तालुक्यामध्ये 'साळवा' गावात राहणाऱ्या, 'अत्तरदे' कुटुंबाचा 'सचिन' हा मोठा मुलगा. सचिन लहानपणीच आपली 'चमक' दाखवतो. 'गुरुजी', 'आई-वडील', 'आजी-आजोबा' व गावातली इतर मंडळी खूश असते. प्रत्येक जण म्हणत असतो, हा खूप 'मोठा माणूस' होणार. त्यांच्या 'मोठ्या माणसाचा' खरा अर्थ लहानग्या 'सचिन' ला मुळी उमगलेलाच नसतो. तो त्याच्या प्रगतीचा प्रवास सुरूच ठेवतो. पुढे १० वी, १२ वी त चांगलं यश संपादन करतो. मग गावातली मंडळी म्हणू लागते, "आप्पा, सचिन खूप शिकीन मोठा हुईन, २ क एकर शेती तुम्हले इकनी पडी".

१० वी, १२ वी पर्यंत २ पांढरे शर्ट, २ खाकी हाफ पँट आणि पुस्तकं वह्या इतकाच खर्च. मग पुढे मात्र, 'सचिन' चं कुटंब विचार करू लागतं, पोरीच्या हुंड्याची चिंता करू लागतं आणि मग पेपरात आपल्याला 'शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या' बातम्या वाचायला मिळतात. मग अश्या गर्तेतूनही एखादा 'सचिन' बापाला धीर देत, 'स्वस्तातलं शिक्षण' म्हणून बी. एस्सी केमिस्ट्री ला एरंडोलच्या महाविद्यालयात प्रवेश घेतो. बसच्या पासचे ही पैसे खर्च होऊ नये, म्हणून 'सचिन', सायकलने कॉलेजला येतो. पेरणीच्या वेळेस, शेतात बापाला मदत करतो. माहीत नसताना, 'झोंबी'तला 'आंद्या' होतो.

माझी आणि 'सचिन'ची भेट फळ्यावरची म्हणता येईल. एरंडोल कॉलेजच्या 'गुणवंत' विद्यार्थ्यांच्या नावांच्या यादीचा फलक. वर्ष २००२-२००३ कदाचित, नांव 'सचिन अत्तरदे', तृतीय वर्ष रसायन, ९१%, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 'सुवर्णपदक'. तसा मी 'सचिन' बद्दल माझ्या मित्रांकडून ऐकून होतो. मग 'सचिन', पुणे विद्यापीठाकडे आपला मोर्चा वळवतो. 'एन सी एल' ची स्कॉलरशिप मिळवून ' एम- एस्सी' फिजिकल केमिस्ट्री ला प्रवेश घेतो. मी त्याला पुणे विद्यापीठातच भेटलो. मीच मुद्दामून त्याला भेटलो, रसायन विभागात जाऊन त्याच्याशी बोललो, होस्टेलच्या त्याच्या रूमवर गेलो. त्याचे 'विचार' ऐकले. तोच फळ्यावरचा 'सचिन', त्याची तीच सायकल. एम-एस्सी ला स्कॉलरशिप मिळवून तो इकडे कसा आला, तो घरी, महाराष्ट्र एक्सप्रेसच्या 'जनरल' डब्याने कसा जातो, 'एम-एस्सी' ला वर्गात २रा आल्याची बातमी, ह्या सगळ्या बातम्या 'सचिन' मला मोठ्या आनंदाने सांगतो.

पुढे 'गेट' ची प्रवेश परीक्षा देऊन 'सचिन' आय-आय-टी पवई ला 'एम-टेक' ला प्रवेश घेतो. तिथे 'नवरात्रोत्सवात' गरबा खेळतो काय? आणि धक्का लागून 'सिमेंटच्या' कडक पटांगणावर पडतो काय? डोक्याला जबर जखम होऊन रक्तस्त्राव होऊन, 'ब्लड-क्लॉटींग' होऊन 'सचिन' मला, त्याच्या कुटंबाला, ह्या 'माणसांच्या जगाला' कायमचा सोडून जातो काय..! अगदी क्षणातच मन सुन्न करून सोडणाऱ्या ह्या घटना. आणि मग संपते, एक क्षणिक कथा. मी लहान होतो, तेव्हा गावाकडे मुलं, फुलपाखरू पकडण्याचा खेळ खेळायचे. लहान-लहान, मोकळ्या जमिनीत उगणारी ४-५ झाडं तोडून त्यांचा असा झुबका तयार करणार. मग झाडांवर, इकडे-तिकडे उडणाऱ्या फुलपाखरांवर, एक असा, त्या झुबक्याचा फटका मारणार. फुलपाखरू शांत होणार, मग हळूच तो मुलगा, ते फुलपाखरू जिवंत पकडणार आणि मग आनंद साजरा करणार. पण... पण. कधी -कधी जोरदार फटका बसून ते फुलपाखरू, मरणार. किती कमी अंतर आहे, त्या फुलपाखरुच्या जगण्यात आणि मरण्यात, "एक जोरदार फटका"... बास. संपली फुलपाखरुची ही कथा. त्या दिवशी 'सचिन' ही त्या फुलपाखरासारखा, रमत-गमत बागळत असणार... पण कुणी मारला मग हा फटका? 'नियती'? काय असेल ही? तिला ही आनंद होत असेल का? फटका मारल्यानंतर, 'आपण' जिवंत राहिल्याचा, आपल्याला पकडण्याचा?

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलामांना आपला आदर्श मानणारा 'सचिन', "त्यांना एक दिवस साळवा गावात आणेन' हे स्वप्न बाळगणारा 'सचिन', 'जीवन' म्हणजे काय? हे उमगण्याचा प्रयत्न करणारा 'सचिन', आपण नेमके कोण आहोत? आपण कोठे जाणार आहोत? आपल्या जीवनाची उद्दिष्टे काय असायला हवीत? हे सगळं जाणण्याचा प्रयत्न करणारा 'सचिन', देशाची, आपल्या गावातल्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न करणारा 'सचिन'. काय वाटलं असेल नेमकं त्याला, शेवटचा श्वास घेताना? हे जग सोडताना? 'जी वस्तू म्हणूया आपण, जन्माला येणार तिचा अंत होणारच', पण २४ वर्षे हे काय मरणाचं वय आहे? जगात किती- तरी लोकं १००-१०० वर्षे जगतात आणि खऱ्या अर्थाने पाहिले तर ते ह्या पृथ्वीला 'भार' च असतात. वाक्य लिहायला, बोलायला, वाचायला कितीही कठिण आणि दुःखदायक असलं, तरी तेच खरं आहे. 'सचिन' आज ह्या माणसांच्या जगात नाही, त्याचं शारीरिक अस्तित्व नष्ट झालंय, इतरांना प्रकाश देणारा, मार्ग दाखवणारा 'दिवा' विझलाय. पण... पण.... 'सचिन' ही वृत्ती मात्र अजरामर राहील... 'सचिन' ची कथा अजरामर राहील. आज जगाच्या पाठीवर अनेक 'सचिन' असतील, स्वप्नं बघत असतील, लढत असतील, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतील.

खरंच काय असेल हो 'मनुष्य-जीवन'? 'जन्म-मृत्यू' हेच सत्य असेल का? "सचिन च्या आत्म्याला देव शांती देवो", हे वाक्य मी उच्चारू कसा? 'आत्मा' म्हणजे काय? माहीत नाही, 'देव' म्हणजे काय? माहीत नाही, 'शांती' म्हणजे काय? माहीत नाही, मग कसं उच्चारू हे वाक्य? आपण कुणी वारलं, तर त्याला २ मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली देतो, खरंच का हो मिळत असेल 'शांती'? आणि ती मिळवून त्याची स्वप्न पूर्ण होतील का? जगात अस्तित्वात असलेले, 'सचिन' ही वृत्ती बाळगणारे अनेक 'सचिन' जेव्हा ह्या 'सचिन अत्तरदे' च्या स्वप्नांचा वसा घेतील, भारत देशाचं, समस्त मानवजातीचं कल्याण होण्यासाठी लढतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने (माझ्या मते) 'सचिन' ला शांती मिळेल.

आज 'सचिन' ला जाऊन साडे तीन -चार वर्षे झाली, त्याची आठवण झाली, मन भरून आलं, म्हणून ही कथा 'सचिन'ची.... सचिनला अर्पण.

-संदिप विनायक पाटील.

१-मार्च-२००९.