बहर

बघ उमलताच तू, मीही खुलू लागलो होतो
तू नकोस बहरू ऐसी, चळू लागलो होतो


तव मिटलेल्या नयनांचा अर्थ उमजला आता
डोळ्यांच्या रंगमहाली वसू लागलो होतो


तू उधळलेस मजवरती सर्व रंग प्रीतीचे
त्या इंद्रधनुष्याने मी दिपू लागलो होतो


वाटेवरती निष्ठेच्या पाय न घसरो माझा
मी मोहक वळणांवरती जपू लागलो होतो


तव कोकिळकूजन सांगे, वसंत देही आला
स्वागतास नकळत दोघे नटू लागलो होतो


गाभुळल्या ओठांवाटे रिमझिम अमृत झरले
मी तृषार्त वसुधेसम ते पिऊ लागलो होतो


या प्राजक्तांनो, घाला, सडा अंगणी माझ्या
मी दवबिंदुंच्यासाठी झुरू लागलो होतो


मम प्रेमगीत शब्दांचे मिंधे उरले नाही
मी मौनातुन आलापी करू लागलो होतो