मन मुक्त पाखरू आकाशी उडते

निद्रिस्त मनाला झाली जाणीव
नसानसातून घूमते नेणीव
चैतन्य आता या रोमी फिरते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

झडून गेली सारी पानगळ
निसर्गात हिरवाई नवथर
मरगळ मनीची दूर वाहते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

चक्षूं मधले सरले पाणी
नव्या ऋतूची नवीच गाणी
नवलाईची अशी धुंदी चढते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

कोण कुठले आता ते जुनेपण
अळवावरचे ते पाणीच केवळ
रित्या गाभारयात मूर्ती ही सजते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

आता न सलते कुठलीच जखम
सुकुमार हात हे पुसती जुने व्रण
पुनःउभारीची आशा उसळते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

तोडून टाकिले सारे बंधन
विस्म्रुतिचे फुटले आवरण
"मी" पण माझे शोधू पाहते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

दिशा चोहोंनी प्रकाश दावती
वाढू लागे कसा नवांकुर माती
तेजाची साद ह्या कानी घूमते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

सावरू लागते हे निष्पाप जीवन
स्वैर लाटेवर हलका एक किरण
पुन्हा जोमाने मी फुलून येते
मन मुक्त पाखरू आकाशी उडते

~~~~जुई~~~~