सारे सारे नियमित!

नाही काही अकल्पित,

सारे काही नियमित!

तांबुसली उगवती,

नवी दृष्टी,नवी सृष्टी!

तेजाळली पूर्व दिशा,

जागवित नव्या आशा!

कळी कळी उमलली,

नव्या रुपे हरकली!

रंग गंध जागे झाले,

रानोमाळी उधळले!

फूलपाखरांची केली,

नृत्यरंगे बहरली!

मधूनच येई भुंगा,

गुंजारवे घाली पिंगा!

पक्षी आले खेळावया,

दंगा-मस्ती करावया!

त्यांना आडवितो कोण?

खुले आकाश-अंगण!

क्षण भाग्याचे-भाग्याचे,

अहंपणा विसरण्याचे!

सुख अवती-भवती,

खुल्या मने वेचू किती?

नाही काही अकल्पित,

सारे काही नियमित!

-----

केली= क्रिडा, खेळ