घरकुल.

 सोसत नाही असे दुःख तू मला का द्यावे

माझाच सखा म्हणता कुणा कशाला बघण्यास जावे

सांग मला हे दुःख पांघरून मी कसे उमलू

तमभरला मनाचा गाभारा तुजवीण कसा उजळू

बांधलेले उन्हातले घर माझे नको अरिष्टांनी विंधू

तुझ्या बाहूतली सावली माझी सांग कुठे शोधू

श्वासातूनी बहरती वेदनांची घन व्याकूळ राने

चांदण्या देहावरच्या विझतील का आसवाने

घेतली अवघी काया अधरांनी गोंदून

निघालास वाटाया पारिजात सवतीच्या अंगणातून

भय मनातले नाही संपत  उरात पेटले आक्रंदन

तुज स्पर्शातले नाही चंदन माझे पदरा झाकले रुदन

होते मला हवे तुझेमाझे छोटेसे घरकूल

ज्याची जमीन मी आभाळ तू अन एक इवलेसे पाऊल