तूच तुझ्या अंगाचे सोडव अवघड कोडे,
नरमदीला छळणारी ही तोड कवाडे
आईपण तू जगात घेउन आलीस जेव्हा,
निर्मात्याला स्वछ दिलासा दिलास तेव्हा
"मी शक्ती मी निर्माती या नव्या जगाची,
कळेल केव्हा नराधमांना महती माझी?
अंगसंग का खेळच असतो काही क्षणांचा?
पैलपारचे असते काही आत मनाच्या!
नामनिराळे होणे शमवून आस क्षणाची,
हीच काय हो खरीच ओळख नरदेहाची?
मला भिजविणे निघून जाणे नीती तुमची,
कुणी जपावी मायवेदना या मातीची?"
प्रश्न तुझे हे पडता कानी मन कालवते
अक्ष्ररात ना तुझे मनोगत कधी मावते