जो जो प्रवेशला तो गालीब होत गेला....

चाले रवंथ आता चारा बरा निघाला
अंदाज सोडताना माझा खरा निघाला

काढा गुऱ्हाळ, घाला, चरकात वांझ चोथा
नाचा जणू रसाचा मोठा झरा निघाला

जो जो प्रवेशला तो गालीब होत गेला
टाकेल पाय जेथे तो आगरा निघाला

काटे बरेच होते आकार खूप मोठा
चिरता फणस निराशा, फ़ुसका गरा निघाला

होता जुळे कुणाला टाळी मिळे जगाची
अन जो प्रसूत झाला तो घाबरा निघाला

खोली प्रचंड आहे, बघण्यास रांग लागे
ऐकून स्पर्श करता साधा चरा निघाला

आवाज हा दुदंभी मी घाबरून गेलो
लांबून पाहिले की तो खाकरा निघाला

विद्वान खूप होते कुलुपामधे विणारे
चावीमुळे उसासा का कापरा निघाला?