अद्वैत

सर्वत्र पुरातन नित्यनूतन मार्गांची कोळिष्टके पसरली होती. मधल्याच एका बंडखोर बिंदूवर ते दोघे उभे होते. भूतलाभोवती गोते खाणारा सूर्य सोडल्यास त्यांच्याकडे कालमापनाचे काहीच साधन नव्हते.

कुठल्यातरी अज्ञात हाताने इशारा केला आणि दोघांनीही चालायला सुरुवात केली.

सापेक्ष बलाची कल्पना यावी असे त्यांच्या शरीरयष्टीत काहीही नव्हते. लहान-मोठा, बलिष्ठ-दुर्बळ, अनुभवी-अननुभवी असली सालपटे त्यांनी दुर्लक्षित केलेली दिसत होती.

प्रत्येकाचा मार्ग निर्विकार निराळा होता, पण एकत्र येऊ नये असेही बंधन त्या मार्गांवर नव्हते.

एकजण मध्येच अडखळला. दुसऱ्याने येऊन त्याच्या पाठीच्या कण्याच्या तळाला हाताचा पूर्ण पसरलेला पंजा लावला आणि त्याला पुढे रेटले.

ओढ्याचा उतार शोधून तो पार करीत असलेल्या दुसऱ्याला अचानक आलेल्या लोंढ्याने गुदमरवले. त्या लोंढ्यातूनच सफाईदारपणे भिरभिरत आलेल्या पहिल्याने त्याला बाहेर काढले आणि त्याच्या पायांना एक मार्ग चिकटवून दिला.

एकजण मध्येच थांबला. दुसऱ्याने आल्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. कुणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

सूर्य गोते खात राहिला.

ज्या निरर्थकपणे त्यांनी चालायला सुरुवात केली होती तसेच ते अचानक थांबले.

सुरुवातीच्या जागेपासून ते रेसभरदेखिल ढळले नव्हते.

पण सगळ्या मार्गांवर ते स्वतःला शिंपून आले होते.