मनश्री

अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही..

कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची, तिच्या आईची आणि साऱ्या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन, तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ, मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा.. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं.

उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरू देवाचं उलट दान घेऊन जन्मलं. आपलं बाळ कधी म्हणजे कधीच काहीच 'पाहू' शकणार नाही हे समजल्यावर कोणाही सामान्य माणसाप्रमाणेच दोघेही उन्मळून पडले पण त्यातून सावरायची जिद्द साऱ्या कुटुंबानं धरली. आजी, आजोबा आणि इवलीशी ४ वर्षांची यशश्री.. साऱ्यांनीच मनूला आहे तस्झं स्वीकारलं आणि एवढेच नव्हे तर जगातलं सुंदर, उत्तम ते ते तिला मिळवून देण्यासाठी त्या साऱ्यांचीच धडपड सुरू झाली.

त्या इवल्याशा जीवाला २४ दिवस वयापासून ऑपरेशन्सच्या यातना भोगाव्या लागल्या आणि तिच्याबरोबरच त्या वेदना सहन कराव्या लागल्या साऱ्या सोमण कुटुंबाला. जन्मांध मनू मुकी बहिरी नाही, बसू शकते म्हणजे चालूही शकेल.. ही शक्यता आणि मेंदू शापित नाही हे लक्षात आल्यावर केवढातरी आधार गवसला. डॉक्टरांच्या सूचनांप्रमाणे स्पर्शातून आणि आवाजातून साऱ्या घराची, घरातल्या माणसांची ओळख करून द्यायची. फळांफुलाचे वास आणि आकारावरून त्यांची ओळख, स्वयंपाकाच्या भांड्यातून झारा, पळी, पोळपाट, लाटणे इ. तून विविध आकारांची ओळख.. अशी तिला बाहेरच्या जगाची ओळख करून देणं सुरू झालं. रंगांची दुनिया तिच्यासाठी नव्हतीच, त्याला पर्याय शोधणं सुरू झालं.

तिला शाळेत घालायची वेळ आल्यावर अंधशाळेच्या मुख्याध्यापकांशी झालेल्या मुलाखतीतून 'नॅब'शी ओळख झाली. जणू अलिबाबाची गुहाच गवसली. तिची उत्तम प्रगती पाहता तिला अंधशाळेत न घालता सर्वसाधारण शाळेत घालण्याचा सल्ला सोमण कुटुंबाने मानला आणि मग सुरू झाला शाळेचा शोध, सर्वसाधारण मुलांच्या शाळांमधील प्रवेशाबाबतचे बरेवाईट अनुभव गाठीस बांधून एकदाचा प्रवेश निश्चित झाला. प्ले ग्रुप मध्ये ती चटकन रमली पण बॉल खेळण्यातली मजा तिला इतर मुलांप्रमाणे अनुभवता येईना. त्याला घुंगुरवाल्या चेंडूचा पर्याय आला. दिशाज्ञानासाठी ह्या घुंगुरचेंडूचा उपयोग होतो. नॅबच्या शिक्षिकांच्या मदतीने अशा अनेक गोष्टी समजू लागल्या. आठवड्यातून एकदा येऊन मनू आणि तिची आई दोघींनाही नॅबशिक्षिका शिकवू लागल्या.

पुढे बालवर्गात गेल्यावर तिची झालेली उपेक्षा, काही दिवसांनी तिला साऱ्यांनी आपल्यात सामावून घेणे, तिचा नाटकातला सहभाग अशा अनेक लहानलहान प्रसंगातून शिकणे चालू होते. रिक्षावाल्याने तिला पळवून न्यायचा केलेला अयशस्वी प्रयत्न, त्यातून तिला बसलेली भीती.. शाळेची लागलेली गोडी, लहान वयात रायटर म्हणून शाळेतल्या अथवा नॅबच्या शिक्षिकांनी केलेले काम तर ४थीपासून पुढे खालच्या वर्गातील रायटर, पिकनिकला तिला घेऊन जाण्याचामित्रमैत्रिणींचा चंग आणि तिला दिलेला आत्मविश्वास.. अशा अनेक हकिगतींमधून मनू समजत जाते.

नॅबच्या शिक्षकांनी अनिता सोमणना नॅबचा कोर्स करण्याचा आग्रह धरला आणि त्याचा खूप मोठा फायदा त्यांना स्वत:ला अंधविश्व समजून घेण्यासाठी झाला. त्यांचे पुरेसे बोलके अनुभव आपल्याला वाचायला मिळतात.

मनूला उपजत असलेली सुरांची आवड पाहून तिला आधी कॅसिओ आणि नंतर सिंथेसायझर आणला तेव्हा हे सूर तिचे नुसते सोबतीच न राहता तिच्या जीवनाचे सुकाणू बनणार आहेत ह्याची कल्पना सोमण कुटुंबाला नव्हती. अनुपम खेरच्या शो मध्ये तिचा सहभाग आणि त्या शो दरम्यान प्रसाद घाडी ह्या 'बालश्री' शी झालेली ओळख, अकृत्रिम स्नेहातून समजलेली 'बालभवन' आणि 'बालश्री'ची माहिती एक नवीन आव्हान पेलण्यासाठी मनाची तयारी घाडीमावशीच करून घेतात.

बालश्री हा पद्मश्रीच्या तोडीचा पुरस्कार! लेखनकौशल्य, विज्ञान, चित्रकला आणि सादरीकरणाच्या कला- गायन, वादन, नृत्य, नाट्य ह्या विषयांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभा शोधून त्यांचा सन्मान 'बालश्री' पुरस्काराने केला जातो. बालभवन तर्फे मुले निवडली जातात. गाव, जिल्हा, राज्यपातळीवरून चाळणी होत होत देशपातळीवरची परीक्षा दिल्लीतील बालभवन मध्ये होते आणि केवळ २०, २१ मुलेच बालश्री पुरस्कारासाठी निवडली जातात. ही माहिती समजल्यावर मुंबईतील बालभवनला भेट देऊन फॉर्म भरण्यासाठीची पात्रता सिद्ध केली. मनूने सादरीकरणाच्या कला हा विषय घेऊन, गायन प्रमुख विषय आणि वादन, नर्तन, नाट्य दुय्यम विषय घेतले आणि मग सुरू झाल्या अनेक परीक्षांची साखळी. शाळेतल्या परीक्षा, अभ्यास सारे सांभाळून ह्या परीक्षा देणं आणि त्यात अव्वल येणं आवश्यक होतं. तल्लख मनू ह्या अडथळ्यांच्या शर्यतीतून यशस्वी पार पडत देशपातळीपर्यंत पोहोचली. दिल्लीत झालेल्या लेखी परीक्षेत हिंदीत उत्तरे लिहायची असूनही तेथील मराठी लेखनिकाने सारी उत्तरे मुद्दामहून मराठीत लिहिली. तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर योग्य कारवाई होऊन तिची उत्तरपत्रिका हिंदीत लिहवली गेली.

बालश्री पुरस्कार मिळाल्यावरचा आनंद आणि प्रत्यक्ष सोहोळ्याचे वर्णन तर पुस्तकात सविस्तर केले आहेच पण मनाला भावतो तो लहानग्या मनूचा आत्मविश्वास आणि लक्षात राहतो तिचा हजरजबाबीपणा. राष्ट्रपतींनी विचारले, " फिर कब आओगी दिल्ली? " तर ह्या चिमणीचे हजरजबाबी उत्तर "पद्मश्री लेने आउंगी।"

ह्या साऱ्या प्रवासाचा वेध, मनश्रीच्या, तिच्या आईवडिलांच्या भावना सुमेध वडावाला(रिसबूड) ह्यांनी मनश्री ह्या पुस्तकात शब्दांकित केल्या आहेत. पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहते ती मनश्रीची आणि तिच्याबरोबरीने तिच्या आईची जिद्द! काही प्रसंगातील अनुभवांचा कटूपणा टाळण्यासारखा होता असे वाटले तरी एकंदरीतच हे पुस्तक झगझगीत प्रकाशाची अनुभूती देऊन जाते.

मनश्री- एका दृष्टिहीन मुलीची 'नेत्रदीपक' यशोगाथा

सुमेध वडावाला (रिसबूड)

राजहंस प्रकाशन

किं रु १६०/-

प्रथमावृत्ती- जून २००८