काळ

पृथ्वीच्या पोटातून आकाश हुंकारल्यासारखा आवाज आला. पृष्ठभागावर उलथापालथी घडल्या. लाव्हा इतस्ततः धावला आणि तपमान विझत गेले तसा आश्चर्यचकित अवस्थेत थबकून राहिला.

त्यातून एक पर्वत उभा राहिला. मान उंचावून त्याने क्षितिजावरची समुद्ररेषा पाहून घेतली आणि डोळे मिटले. अजून भरपूर वेळ शिल्लक होता.

कमरेला पाने गुंडाळलेले मानव नाचत ओरडत आले. शिखरावर अग्नी पेटवून त्यांनी आभाळाकडे हात रोखले आणि आरोळ्या ठोकल्या. मग त्यांनी त्यांच्यातल्याच एकाला आगीत बळी दिले.

पर्वताने आळसट नजरेने सारे पाहून घेतले.

ढाली तलवारी घेतलेले घोडेस्वार दौडत आले. तुंबळ युद्ध झाले. रक्तामांसाचा सडा पडला. कुठल्यातरी स्त्रियांच्या अब्रूचे, कुठल्यातरी मुलांच्या जिवाचे, कुठल्यातरी शेतांच्या मालकीचे, कुठल्यातरी नद्यांच्या प्रवाहांचे भवितव्य ठरवले गेले. घोडेस्वार गर्जना करीत लुप्त झाले.

पर्वताच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि ओठांचा कोपरा जरा वाकडा झाला. अजूनही वेळ होता.

पर्वताच्या पायथ्याला सापासारखा काळा चट्टा उभवून आला. त्यावरून प्रखर कृत्रिम प्रकाशाची वाहने ये-जा करू लागली. मधूनच फळ चिरडल्यासारखा एखादा जीव त्या काळ्या मार्गावर लाल सडा घालू लागला.

पर्वत जरासा गडबडायला सुरुवात झाली.

घारीसारखे दिसणारे आणि लक्षावधी भुंग्यांसारखा आवाज करणारे काहीतरी निळ्या आकाशवस्त्राला टरकावीत गेले. जमिनीवर ठिकठिकाणी आगीचे कल्लोळ उसळले.

पर्वत गडबडला. भिजलेला लाव्हा आपण पुन्हा कधी गतिमान होणार हे जाणून घेण्यासाठी पर्वताकडे पाहू लागला.

किती वेळ शिल्लक आहे कुणालाच ठाऊक नाही. पर्वतालादेखिल.

कारण भेदरलेल्या काळाने पर्वताच्या पोटातच दडी मारली आहे.