खुल्या मनाने सर्व बाजूने ,
विचार थोडा करा!
मित्र हो! विचार थोडा करा!
बिकट समस्या समोर येता
निडर मनाने भिडा,
तयाला निडर मनाने भिडा!
धीर सोडता विचार खुंटे!
अविचारी मन उगा भरकटे!
नको-नको ते मनात येते,
होणारे ही काम बिनसते!
क्षणा-क्षणाला स्थिती पालटे,
अनेकदा ती अनुकूल होते!
धीर असावा जरा अंतरी,
सुखद अनुभव पाहा निरंतरी!
विचार करिता दिशा उमगते,
अडल्या प्रश्ना उत्तर मिळते!
'प्रश्नामध्ये उत्तर असते',
या सत्याचे दर्शन घडते!
विचार किल्ली हाती येता,
गूढ न आता गूढ रहाते!
यत्न-साध्यता सहजी येते,
विचार महती इथे समजते!
विचारात जो वेळ खर्चितो,
वायार्थी ना समय दवडितो
क्रोध-मोह मग सहज जिंकितो!
यश-वैभव तो नित्य पहातो!