कधी न गाढवे बना...

खोलता खुराड का सजीव पारवे बना?
मानवी नियंत्रणातलेच का थवे बना?

हाय, चांदणे, गडे, फुले, वसंत, मोगरा
मूळ फक्त शोभते, नवे लिहा नवे बना

सूर्य लोपला तरी मनात जाण राहते
चालतो तिमीर, का उगाच काजवे बना?

जे जगाल ते लिहा, कुणास नक्कला हव्या?
मानवी रुपातली कधी न गाढवे बना

कायदे कधी स्वतः करू नयेत फालतू
नग्न लोक पाहता, खुशाल नागवे बना!