मला भावलेलं एक आगळं – वेगळं प्रदर्शन

शाळेत शिकलेला इतिहास हा नेहमीच सनावळी व तहांच्या कलमांमध्ये अडकलेला असतो. पण, हाच इतिहास जर आपण आकर्षक रित्या लोकांसमोर आणला तर तो कसा रंजक होऊ शकतो याचा प्रत्यय मला नुकताच मी भेट दिलेल्या अमेरिकेतील एका प्रदर्शनातून आला.
चंगीस खान! हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते बाराव्या शतकातील एका मंगोलीयन राजाचं क्रुर व्यक्तिमत्व! युरोप, आशिया पासून ते थेट जपान पर्यंत साम्राज्यविस्तार केलेला हा राजा त्याच्या राज्यातील जनतेसाठी क्रुर नव्हता हा भाग निराळा; पण, या प्रदर्शनातून खरोखरच चंगीस खान चे विविध पैलू अभ्यासायला मिळाले.

या प्रदर्शनाची एकुणच आखणी खूप वैविध्यपूर्ण व विचार्पूर्वक करण्यात आली होती. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व लोकांना बुकमार्क्स दिले गेले ज्यावर चंगीस खान शी निगडीत एका व्यक्तीचे चित्र रेखाटलेले होते. आणि ही व्यक्तिरेखा नक्की कोण, त्या व्यक्तिचे चंगीस खान च्या आयुष्यातील स्थान काय हे प्रदर्शनामध्ये जाऊन शोधून काढायचे होते. ही पहिलीच पायरी या प्रदर्शनाबद्दल माझ्या मनात कुतुहल निर्माण करून गेली.

आतमध्ये प्रवेश करताच समोर एक अवाढव्य, किमान 8-10 फुट उंचीचा, चंगीस खानचा  धातुचा पुतळा ठेवण्यात आला होता. थोडे पुढे गेल्यावर एका भिंतीवर चंगीस खानच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचा कालानुरुप मांडलेला आराखडा होता. चंगीस खान म्हणजे नक्की कोण, याची प्राथमिक माहिती देणारा लघुपट तेथे दाखवण्यात येत होता.
बाराव्या शतकातील मंगोलीयन घराची प्रतिकृती तेथे उभारण्यात आली होती. या घराच्या मांडणीतून सुद्धा तेथील लोकांची कुटुंब-व्यवस्था व पुरुषप्रधान संस्कृती कळून येत होती. मंगोलीयन देशातील लोकं तेथील हवामानाला अनुसरून घरे कशी बांधायची; हे दाखवणारा एक लक्षवेधक लघुपट तेथे सुरू होता. युद्धात वापरली जाणारी अस्त्र-शस्त्रे, चिलखते, अगदी खरी वाटावी अशी मंगोलीयन योद्धयाची अश्वारुढ प्रतिकृती इत्यादी गोष्टींची मांडणी कल्पक होती. थोडे पुढे जाताच प्रवेशद्वारजवळ जो बुकमार्क देण्यात आला होता; त्यावरील व्यक्तिरेखेविषयी माहिती देणारी स्क्रीन माझ्यापुढे होती. या टच स्क्रीन वर चंगीस खान शी निगडीत असलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे त्याचे मित्र, शत्रू, सेनापती, युरोपातील त्याचे गुप्तहेर अशी सर्वांची माहिती प्रदर्शनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत देण्यात आली होती. आणि खरोखर या व्यक्तिरेखा कालानुरुप अगदी नाट्यमयरित्या उलगडत जात होत्या. या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून चंगीस खानच्या स्वभावाचे विविध पैलू माझ्यासमोर येत होते. जर या व्यक्तिरेखांविषयी मला एखाद्या पुस्तकामधून किंवा माहितीपत्रकामधून वाचायला सांगितले असते तर कदाचित ते कंटाळवाणे झाले असते पण, इथल्या या नाविन्यपूर्ण मांडणीमुळे बाहेर पडल्यानंतरही या व्यक्तिरेखा अगदी व्यवस्थित लक्षात राहिल्या.

युद्धकौशल्य, युद्धनिती, कायदेव्यवस्था, युद्ध जिंकून काबीज केलेले निरनिराळे भौगोलिक प्रदेश या सर्व गोष्टींची आकर्षक स्वरुपातील मांडणी चंगीस खान विषयी सविस्तर व रंजक माहिती पुरवण्यास समर्थ होती. कोण कुठला हा कोसो दूर राज्य केलेला, बाराव्या शतकातील चंगीस खान त्याच्या राजनिती, युद्धनिती व सामाजिक परिस्थितीसह माझ्या ओळखीचा झाला.

या सर्व लेखनप्रपंचाचा उद्देश एवढाच की, भारतात अशी वैविध्यपूर्ण प्रदर्शन आयोजित केली तर विविध विषय रंजक पद्धतीने जनमानसासमोर येऊ शकतील. भारतात अशी प्रदर्शन आयोजित केली जात नाहीत अशातला भाग नाही. परंतु, या आयोजनात वेगवेगळ्या माध्यमांचा व त्याच्या जोडीला नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर एखादा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. उदाहरणार्थ, या चंगीस खानच्या प्रदर्शनात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, चंगीस खानविषयी जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या लोकांपासून ते चंगीस खान वर पी. एच. डी. करणाऱ्या लोकांपर्यंत; अशा सर्व प्रेक्षकवर्गासाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती व मांडणी होती.

भारतीय इतिहासाचा विचार केला तर सुश्रुत, वराहमिहीर, चाणक्य, भास्कराचार्य यांसारखे वैज्ञानिक व विचारवंत आणि चालुक्य, सातवाहन यांपासून थेट पेशव्यांपर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवलेल्या कितीतरी व्यक्तिरेखा विस्मरणात गेल्या आहेत. या काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तिरेखा जर आपण त्यांच्या कार्यासह आजच्या ‘GENERATION X’  पुढे रंजक स्वरुपात सादर केल्या तर आजच्या तरुण पिढीला व भावी पिढीला या सर्व व्यक्तिरेखांविषयी व त्या अनुशंगानी इतिहास, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, राजनिती, युद्धनिती यांसारख्या विविध विषयांची जवळून ओळख होऊ शकेल. अशाप्रकारे स्वकर्तृत्वाने मानदंड प्रस्थापित केलेले "खरेखुरे आयडॉल्स" जर आपण आजच्या पिढीसमोर ठेऊ शकलो; तर त्यांच्या विचारांना नक्कीच नवी दिशा मिळू शकेल.