भरली तोंडली

  • तोंडली २० ते २२ नग
  • ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
  • दाण्याचे कूट अर्धी वाटी
  • तीळ कूट पाव वाटीच्या थोडे कमी
  • लाल तिखट १ चमचा, धणेजीरे पूड १ चमचा
  • गरम मसाला १ चमचा, चिरलेला गूळ ३-४ चमचे
  • मीठ
  • चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
  • फोडणीसाठी तेल
  • मोहरी, हिंग, हळद
३० मिनिटे
२ जण

क्रमवार  मार्गदर्शन : तोंडली पाण्याने धुऊन ती रोवळीत पाणी निथळण्यासाठी ठेवा. पाणी निथळले की कोरड्या फडक्याने पुसून घ्या. प्रत्येक तोंडल्याची देठे काढा दोन्ही बाजूने. नंतर दोन्ही बाजूने अगदी थोडे चिरा मसाला भरण्यासाठी. नारळाचा खव, दाणे व तिळाचे कूट, लाल तिखट, गरम मसाला, धणेजिरे पूड, गूळ, चवीपुरते मीठ व चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मसाला तयार करून घ्या. मसाल्याची चव बघा. काही कमी जास्त हवे असल्यात ते जिन्नस घाला. नंतर प्रत्येक तोंडल्यामध्ये मसाला भरून घ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे. मसाला पूर्ण भरून झाला आणि तरीही थोडा उरला तर तो उरलेला मसाला वाटीत भरून ठेवा.

मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व लगेच त्यात मसाला भरलेली तोंडली घालून थोडी ढवळून घ्या. आच मध्यम असूदेत. त्यावर झाकण ठेवा. वाफेवर ही तोंडली शिजतील. काही सेकंदांनी झाकण काढा व त्यात थोडे पाणी घाला. परत झाकण ठेवा. व परत ते काढून परत पाणी घाला. उरलेला मसालाही त्यात घाला. मसाला उरला नसेल आणि कमी वाटत असेल तर नंतर हवा तसा मसाला वरूनही घालता येतो. वाफेवर तोंडली शिजली की गॅस बंद करा. तोंडली शिजली की त्याचा रंग बदलेल. आणि शिवाय डावेने टोचूनही बघा. तोंडली सहज तुटली की ती शिजली असे समजावे. पाणी पण ज्याप्रमाणे रस हवा असेल त्याप्रमाणात घालावे.

ही भरली तोंडली खूपच चविष्ट लागतात. पूर्वी लग्नकार्यामध्ये मुंबईत ही भरली तोंडली खाल्ली आहेत. बऱ्याच प्रमाणात करायची असेल तर तोंडली आधी कुकर मध्ये शिजवून घ्यावीत. ती खूप गार झाली की मग त्यामध्ये मसाला भरावा. पोळीभाताबरोबर छान लागतात. नुसती वाटीत घेऊन खायला पण मस्त लागतात.

नाहीत

सौ आई