अंधारयात्रा

सर्वत्र अविचल अंधाराचा ओघ वाहत होता. पूर्ण, स्वच्छ, प्रियेच्या हास्यासारखा खळाळता सूर्यप्रकाश आपण कधी पाहिला होता हेदेखील त्याला आता स्मरत नव्हते. कणाकणाने कमी होत जाणारा प्रकाश आणि गळफासासारखा वेढत जाणारा काळोख एवढेच त्याच्या स्मरणात गुंजत होते.

आणि ही सर्व क्रिया एवढ्या मंदपणे सरपटत होती, की भोवती आहे तो अंधार की प्रकाश याचा त्याला वारंवार भ्रम पडत होता.

डोळे ताणताणून त्याने समोर बघितले. मंदिराचा काहीच मागमूस नव्हता.

चालता चालता त्याच्या पायतळी स्वच्छ सारवलेले अंगण आले. दमून त्याने पडशी खाली टाकली आणि तेथेच बैठक मारली. तत्क्षणी समोरच्या अंधारात एक शुभ्र वस्त्र ल्यालेली आकृती काच तडकावी तशी तटकन उमटली. त्याने दचकून समोर पाहिले.

"ऊठ, मला तुझा न्याय करायचा आहे" पाण्यावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशासारखा तो आवाज टोकदार होता.

तो गोंधळला. "माझा न्याय? आणि तो कशाबद्दल? मी तर ताम्रवर्णी विष्णूचे मंदिर शोधतो आहे. "

"ते शोधत असताना तू माझ्या हद्दीत आलास, हा तुझा गुन्हा. "

शुभ्र वस्त्रांमुळे प्रकाशाचा आभास त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती रेंगाळत होता. त्याने टक लावून त्या व्यक्तीकडे बघितले. "अरे, तूच तर मला सर्वप्रथम भेटलेला म्हातारा. तूच मला मळलेली पाऊलवाट सोडून या नासक्या अंधारात ढकललेस. तूच मला मंदिराचा रस्ता दाखवलास. तूच मला भुलवून इकडे आणलेस. आणि आता तू माझा न्याय करणार?" हताश संतापाने त्याचा आवाज चिरकत गेला.

"भलतेसलते बडबडू नकोस. तू मला मंदिराचा रस्ता विचारलास, मी हा रस्ता दाखवला. तुला नंतर भेटलेला गुराखीदेखील मीच होतो. पण म्हणून मी तुला भुलवून आणले हे कसे? "

"हे कसे? मी रस्ता विचारला. त्यांनी..... म्हणजे तू..... हा रस्ता दाखवलास. मग हा मांजरखेळ कसला? "

"थांब. त्यांनी तुला रस्ता दाखवला म्हणजे काय? तू मंदिराचा रस्ता विचारलास, त्यांनी हा रस्ता दाखवला. त्यांना नीट ऐकू येते ना याची तू खात्री करून घेतलीस? वाटेत भेटलेले दोन पांथस्थ नैसर्गिक सहजतेने एकमेकांना अभिवादन करतात. नीट आठव. त्यांची तुझ्याकडे पाठ होती. तुझी चाहूल लागूनही त्यांनी वळून पाहिले नाही की तू त्यांच्यासमोर उभा राहीपर्यंत तुझ्या अभिवादनाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मग ते बहिरे कशावरून नव्हते? "

"पण तू आत्ता तर बहिरा नाहीस. मग तेव्हा कसा असशील? "

"का? मी कधी बहिरे असावे हे तू ठरवतोस? सत्य हे एकच आणि वज्रलेप असते या खुळचट कल्पनेचा तुझ्या मनावर पगडा बसला आहे. एकदा बहिरा म्हणजे कायमचाच बहिरा हे तू का गृहीत धरतोस? "

"मग, मग काय खरे समजायचे? तू आत्ता माझ्यापुढ्यात उभा राहून बोलतो आहेस हे तरी सत्य कशावरून? "

"अगदी बरोबर. हे तरी सत्य कशावरून? मला तरी काय माहीत? आणि सत्य म्हणजे तरी काय? त्या शब्दाने तुझ्या मनात जे सूर उमटतात तेच बाकी सर्वांच्या मनात उमटतात असे तू का मानतोस? सत्याच्या नावाने हा आक्रोश कशाला?

"असो. तुम्हा मानवांबरोबर संवाद साधायचा म्हणजे हीच अडचण आहे. उंबरातल्या किड्यांप्रमाणे तुम्ही बाकी विश्वाविषयी अज्ञ असता.

"आता तुझी सजा. तू अंधारातच वाट चालत राहशील. आणि त्या वाटेला दिशा नसेल. पुढे-मागे, डावी-उजवी, वर-खाली हा भेद तुझ्या लेखी संपेल. "

भीतीने तो थरथरू लागला. अवसान आणून त्याने पिंजकत चाललेला आपला आवाज गोळा केला.

"वा रे न्याय. माझी बाजू ऐकून न घेता दिलेला हा कसला न्याय? मी, मी कोण वाटलो तुला? मी घडवलेल्या शिल्पांमुळे गावोगावचे लोक चकित होऊन तोंडात बोटे घालत. दगड माझ्या स्पर्शाने झंकारू लागे. मी घडवलेली कावळ्याची मूर्ती पाहून कुत्रीदेखील भुंकू लागत. "

"पुन्हा तेच. सजा देणारा मी. तुझी बाजू ऐकून घ्यायची की नाही हे ठरवणाराही मीच. नाहीतरी तुझ्या मनावर चिकटलेली भूतकाळाची सालपटे काढून मला काय मिळणार? "

विरके कापड फाटावे तसा तो हसला. "आणि मी अंधारात वाट चालत राहीन म्हणायला आत्ता कुठे मी प्रकाशात आहे? मी कधीकाळी प्रकाशात होतो हेसुद्धा मी विसरत चाललो आहे. मग तुझ्या या सजेला काय अर्थ उरला? "

"तू आतापर्यंत अंधारात चालत होतास की प्रकाशात हे मला ठाऊक नाही. असायची गरजच नाही. तुला मी भविष्यकाळातली सजा दिले. तुझ्या लेखी अंधार-प्रकाश एकच असेल तर माझा इलाज नाही. शेवटी मीही काही सर्वज्ञ नव्हे. मला अंधाराचा अर्थ समजतो. आणि प्रकाशाचा. बाकी सर्व माझ्यालेखी दाणे नसलेल्या शेंगेसारखे पोकळ आहे. "

सूर्याने आपले शुभ्र वस्त्र सवरले आणि तो निघून गेला.

तो अजून चालतोच आहे. आपण आणि अंधार यात काय फरक आहे हेही त्याला उमगेनासे झाले आहे.