पेरणी केलेली झाकूनिया मढे, जनाईचे जाते पिठासाठी अडे.
व्याज करी फस्त सावत्याचा मळा, मोट नाड्यामध्ये लटकतो गळा.
कर्जाचे कागद तुक्याने फाडले, मढ्यावरी इथे व्याजही चढले.
देहाच्या देहूत घाम इंद्रायणी, भंगलेली गाथा तारायची कुणी ?
घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा, हाडांच्या काडांना एकादशी थारा.
कुठे ज्ञानदेवा भूमीचे मार्दव? करपते इथे कोंभाचे आर्जव.
अन्नदाता मरे उपाशी राहून, नाथाच्या घरची कशी उलटी खूण?
लेकुरवळा विठू घेत असे फाशी. रुख्माईला पेच सांगा जगू कशी?