कधी कोणते गीत

कधी कोणते गीत येऊन छाती
कापून काढेल ठाऊक नाही!

शब्दातले मंत्र म्हणता 'तथास्तु'
जन्मेल ते कोण ठाऊक नाही!

थवा भावनांचा कधी आपला अन
कधी वाटतो परग्रहाचा कुण्या

तरी अट्टहास त्या बांधावयाचा
कशाला पुन्हा तो ठाऊक नाही

तया खोड जुनीच हुलकावण्याची
जिवाची कशी होतसे ओढताण

लपतो पुन्हा अन पुन्हा दर्शना का
येतो समोरी ठाऊक नाही