प्रवाह कैसा लोक प्रथांचा!
विचित्र वळणे घेत चालला!
कधी हवीशी, कधी नकोशी,
वळणा नाही खंड रे!
विचारशक्ती जिथे हरवते,
प्रवाह तेथे उगा घुटमळे!
गढूळ ऐशा वातावरणी,
विवेकासची साद रे!
प्रवाह पतितता, अमान्य मजला,
प्रवाह रोखणे, मार्ग नकोसा!
प्रवाहास या वळण लावणे,
हा तर माझा छंद रे!
विचारसरणी साफ असावी,
वर्तन आपुले तसे असावे,
शक्य तेवढे पटवून द्यावे,
सक्ती तितुकी त्याज्य रे!
रूढिप्रियता समाज पोसे,
सहज बदलणे त्यास न सोसे,
काळासंगे टक्कर घेणे,
हेच माझे ब्रीद रे!