तुझं हासणं....

तुझं हासणं... तुझं हसू निखळ..? निरागस..??  
छे... खट्याळच ते तुझ्यासारखं!!

माझ्या मनात गंधाळणारं, रेगाळणारं, अलवार...
भोवताली गर्दी माणसांची,  
मी ही चालत असते त्याच गर्दीचा भाग बनून, आपल्यतच मग्न, विषिण्ण...
तेव्हा भासतात मला ते क्षणिक क्षण पोळणारे, जाळणारे..
आणि माझा एकांत अधिक ठळक होत जातो, गडद होत जातो.. गर्दीत माणसांच्या.

जिवाची तगमग, घुसमट खोलवर झिरपत जाते, झरत जाते....   
गुंता वाढत जातो असलेला अन नसलेलाही..
मी होते पुन्हा रिक्त, विरक्त मनाने.... जणू कोणीच नाही माझं.. कुणीच नाही...
उरतो फक्त आकांत मनाच्या गाभाऱ्यात.. पोरका, मुका.. मुकासा.

त्याच व्याकुळ क्षणी समजून, उमजून वाळवंटात जशी मंद झुळूक यावी..
तशा तुझ्या आठवणी, तुझं हासणं, बोलणं, सतावणं...
सरसरून जातात अंगावरून माझ्या... अलगद..

मनास स्पर्शून जातो तुझा निस्पर्श..
मनाच्या गाभऱ्यात निनादत असतो फक्त तुझाच नाद..
कित्येक हळूवार, बेभान, नादान, निरागस, भावूक क्षण जिवंत होतात..
तुझ्यात गुंतलेले, तुझ्यात जगलेले...

मग कळत नकळत बंडखोर हसू उमटतं अगदी आतून.. खोल काळजातून..
दडपलेलं, दडवलेलं.... मंदशी स्मित रेषा उमटते माझ्या चेहऱ्यावर..

कशी?.. सावरू त्या निसरड्या क्षणी..
जेव्हा भर गर्दीत मला आठवतं.... तुझं खट्याळ हसणं....  

************************************************