घननीळ...

शरीराला भूक आहे,

सारं आपसूक आहे ।

कुणी म्हणे दुःख दुःख,

कुणी म्हणे सूख आहे ।

पायाखाली वाट आहे,

वाटसरू  गात आहे ।

वाटेमध्ये सूर त्याच्या,

भरलेला दाट आहे ।

रानोमाळ वारा आहे,

दूर कुठे तारा आहे ।

काळ सारा, जणू काही

चिमटीत पारा आहे ।

भीती आहे, प्रीती आहे

थोडी थोडी नीती आहे ।

काही-थोडं अनमोल,

काही-थोडं माती आहे ।

जाणिवेचा डोह आहे,

क्षणा क्षणा मोह आहे ।

चूक आणि बरोबर

यांचा उहापोह आहे ।

'आहे' आहे, 'नाही' आहे,

इथे सारं काही आहे ।

सारं काही असूनही

उणं काही-बाही आहे ।

ओठावर  शीळ आहे,

खोलवर पीळ आहे ।

तुझं, माझं, आपलं सारं

जिणं घननीळ आहे ।