पाल

जाण्यास त्रास मधुनी आगीस होत आहे
त्रेसष्ट अंक त्यांचा छत्तीस होत आहे

हे काय पाहतो मी? हे काय ऐकतो मी?
छत्तीस पाहिजे ते चोवीस होत आहे

जो शुकशुकाट भासे, तो चुकचुकाट आहे
वाईटसा शकुन हा पालीस होत आहे

तारुण्य शेवटी हे जातेच वैजयंती
बघुयात कोण आता, नर्गीस होत आहे

नाते जुने मिळाले येऊन आपल्याला
हा सार्थ गर्व आता मातीस होत आहे

सोयी म्हणायच्या की ही गैरसोय आहे?
लेंग्यास व्हायचे ते नाडीस होत आहे

झाला विवाह कोठे, गेली वरात कोठे
मुलगा हिला हवा अन, भलतीस होत आहे

होते घरातले ते, दे हाकलून त्यांना
माझेच ताट हा भ्रम वाटीस होत आहे