ह्यासोबत
"हे मिस्टर मदन.... मदन शृंगारपुरे. आज पासून आपल्याला जॉईन होताहेत, बिपिनच्या जागेवर...... "
समोर बसलेल्या पण त्या क्षणी उठून उभे राहत असलेल्या त्या तरुणाची घाणेकर साहेब ओळख करून देत होते.
"....... आणि मिस्टर शृंगारपुरे, लेट मी इंट्रोड्यूस, हे मिस्टर कारखानीस.. आमच्या... आय मिन् आपल्या ड्रॉईंग सेक्शनचे सिनीयर ड्राफ्टसमन"
" ओह, वेलकम! " मी हस्तांदोलनासाठीं हात पुढे केला.
" मिस्टर कारखानीस, प्लीज, यांना सेक्शनला घेऊन जा. सर्वांना इंट्रोड्यूस करा आणि कॅरी ऑन. वुईल यू प्लीज.... "
" येस शुअर, सर"
" मिस्टर शृंगारपुरे, मिस्टर कारखानीस वुईल बी युअर इमिजिएट सुपिरिअर. होप, यु वुईल एंजॉय हिज कंपनी. सो, गुड लक"
पुण्याच्या एका नांवाजलेल्या लिमिटेड इंजिनियरिंग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आरेखन कार्यालयाचा मी वरिष्ठ आरेखक होतो. नुकताच एक बिपीन दास नांवाचा आरेखक नौकरी सोडून गेला होता. त्याची जागा रिकामीच होती. त्या जागेवर या तरुणाची योजना झाली होती. एवढे आणि एवढेच माझ्या लक्षांत आलेले होते. कारण ही नेमणूक तशी अचानक झालेली होती आणि ती कुणाच्या तरी शिफारशीने झालेली असावी असा मनांत एक कयास निर्माण झाला होता. अर्थात त्यामुळे कांही प्रशनचिन्हंही!
मी त्या तरुणाला माझ्या टेबलापाशी घेऊन येई पर्यंत सेक्शनमध्ये कुतुहलाची अस्पष्टशी कुजबुज सुरू झालेली होती. सर्वांशी त्याची ओळख करून द्यायची होतीच. पण त्या आधी मला त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. शृंगापुरेला समोरच्या खुर्चीत बसण्याचा निर्देश करून मी सुरुवात केली.
" हां मिस्टर शृंगारपुरे, बसा. "
" सर, प्लीज मला अहोजाहो करूं नका. लहान आहे मी तुमच्या पेक्षा. मला तुम्ही नुसतं मदन म्हटलं तरी चालेल"
मला त्याच्या या बोलण्याचं थोडं हसूं आलं. कारण कपाळावर येऊ पाहणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत हे जे कांही तो बोलला त्यांत एक लाडिकपणाची छटा होती. मी त्याच्या कडे जरा निरखून पाहिलं. गौर वर्ण, बऱ्यापैकी उंची आणि शरीर यष्टी, अतिशय नीट नेटका पेहेराव, या साऱ्याशी हे त्याचे लाडिकपणे बोलणे कांहीसे विसंगत होते. त्याच्याशी हस्तांदोलन केले तेंव्हाही त्याच्या हाताचा स्पर्श कांही निराळाच वाटला होता. पण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करण्याची सध्या तरी गरज नव्हती. त्याला कार्यालयाची आणि कार्यालयाला त्याची ओळख करून देणे अधिक महत्वाचे होते.
मी त्याची प्राथमिक ओळख करून घेतली. इंजिनियरींगची पदविका प्राप्त केल्या नंतर त्याने मुंबईच्या एका प्रख्यात इंजिनिरिंग कंपनीत कांही वर्षे नौकरी केलेली होती. तिथे उमेदवारी संपताच त्याने लग्न केले. त्यानंतरही तो सहा वर्षे मुंबईतच राहिला होता पण मुंबईची हवा त्याला मानवेनाशी झाली म्हणून त्याने पुणे गांठले होते आणि एका व्यवसाय विनिमय दलाला मार्फत ही नौकरी मिळवली होती. ही सगळी माहिती सांगतांना त्याचं अतिशय मृदू आणि लाडिक बोलणं मात्र जरा विचित्र वाटत होतं. विशेषत: " इथे घरी कोण कोण असतं? " या माझ्या प्रश्नावर त्याने, " मी आणि आमची फॅमिली एवढेंच" हे जे कांही उत्तर दिले ते इतके लाजून की, मला मोठी मौज वाटली. आणि " आमची फॅमिली" म्हणतांना त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत जे भाव होते ते विलक्षण रोमांचकारी होते. जणू त्या क्षणीही पत्नी त्याच्या समोर होती. मला हंसू दाबून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागला.
मी मदन शृंगारपुरेला त्याची कामाची जागा दाखवली, कामाचं स्वरूप समजावून दिलं आणि सर्वांशी रीतसर ओळख करून दिली. औपचारिक ओळखी नंतर थट्टामस्करीसह होणारी खरी ओळख दुपारच्या जेवणाच्या वेळेला सुरू झाली. मी वयाने आणि अनुभवाने थोडा मोठा होतो म्हणून वरिष्ठ खरा पण तसे सर्वच सहकारी जवळपास सारख्याच वयाचे होते, आणि शिवाय अस्सल पुणेकर होते. कार्यालयीन वेळेनंतर मीही शिंग मोडून मी त्या कळपातलाच एक बनून राहत असें. त्या मुळे अशा अनौपचारिक वे़ळेला त्या उतांतही मी सामिल होत असें. आम्हाला असें एखादे गिऱ्हाईक हवेंच असायचे आणि आता तर ते आयतेंच मिळालेले. मग त्या दिवसा नतंर रोजचेच एक उधाण येऊ लागले. त्याच्या मदन या नांवाची जशी यथेच्च टिंगल झाली आणि लाडिक बोलण्याचीही. बापट तर एकदा म्हणालाही की आपण जर तरुण तुर्क - म्हातारे अर्क हे नाटक जर बसवले तर त्यातल्या ’ कुंदा’ चे पात्र शोधायला नको. मात्र शृंगारपुरे कधी चिडला नाही. सगळी टवाळी तो हंसत हंसत झेलायचा. खरी गंमत वाटायची ती, तो पत्नीचा उल्लेख फॅमिली असा करायचा त्याची.
एकदां तो त्याची फॅमिली इडली सांबर खूप छान करते असें म्हणाला तर कोणीतरी सप्रयोग सिद्ध कर म्हणालं आणि पुढच्याच रविवारी सगळे इडली सांबर खायला त्याच्या घरी जातील आणि अनायसे वहिनींची ओळखही होईल असा बूट निघाला. तेंव्हा मात्र तो थोडा भांबावलेला दिसला. पुढच्या रविवारी त्याची फॅमिली माहेरी जाणार आहे हे सांगतांना त्याचा चेहरा ओशाळवाणा झाला होता. मात्र कां कोणास ठाऊक, ती त्याची केवळ सबब असावी आणि आम्हाला तो त्याच्या घरी नेण्याचे टाळतो आहे अशी त्याच्याच शेजारी बसणाऱ्या बापटला शंका आली. ती त्याने खाजगीत बोलूनही दाखवली. पण असतांत अशी कांही माणसे, ज्यांना मर्मबंधातले कोश जपायला अधिक आवडतं. त्यातला हाही एक असेल म्हणून मी बापटची समजूत काढली.
पण दुसऱ्याच दिवशी हा बहाद्दर कामावार येतांना दोन मोठ्या डब्यात इडली सांबर आणि एका छोट्या डब्यात ओल्या खोबऱ्याची उडपी उपाहारगृहांत असतें तशी चटणी, शिवाय स्टीलच्या ताटल्या, चमचे एवढा सगळा जामानिमा घेऊन आला तेंव्हा आम्ही चाटच पडलो. त्याच्या फॅमिलीने इडली सांबर मात्र अप्रतिम चवीचे केले होते. सगळ्यांनी वानवानून त्याचा फडशा पाडला. शृंगारपुरेचा चेहरा कृतकृत्यतेने उजळला होता. त्याच्या फॅमिलीने इतका मोठा उठारेटा केला याचे मला कौतुक वाटले. बापटला मात्र ती चव विश्व या उपाहारगृहातल्या इडलीसांबार सारखीच कशी हा प्रश्न पडला होता.
त्यानंतर शृंगारपुरे मधून अधून कांही ना कांही खाण्याचे पदार्थ आमच्या साठीं घेऊन येत असें. कधी शंकरपाळे तर कधी चकल्या. कधी बेसनाचे लाडू तर कधी खोबऱ्याची बर्फी. साक्षात अन्नपुर्णेने केलेले असावे अशी त्या पदार्थाची चव असायची. तसेंही त्याच्या जिभेवर सतत फॅमिलीचेच गुणगान असायचे. दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलतांना आम्ही कधी त्याला ऐकला नव्हता. बायकोवर इतके प्रेम करणारा तरुण आम्ही प्रथमच पाहत होतो. एकदा त्याने आणलेली बाखरवडी तर ती चितळे मिठाईवाले यांच्याकडून मागवलेली असावी इतकी खुसखुशीत होती. त्याची बायको खरोखरच इतकी सुगरण असेल कां ही शंका आम्हां सर्वांनाही आलीच होती. तरी, खाल्ल्या बाखरवडीला जागायचे म्हणून कोणी तशी कांही टिप्पणी केली नाही. पण बापट तसा गप्प राहणाऱ्यातला नव्हता. त्याने हल्लाबोल केलाच.
" ए खरं सांग मदन्या, ही बाखरवडी चितळेची आही की नाहीं. च्यायला तुझ्या बंडला खूप झाल्या हं"
" नाही हो. देवा शपथ सांगतो. आमच्या फॅमिलीनेच बनवलेली आहे ती" शृंगारपुरेचे डोळे पाण्याने डबडबले.
" चल मग तुझ्या घरी घेऊन चल एकदा आम्हाला सगळ्यांना. वहिनींना आम्ही समक्षच कॉंप्लीमेंट देऊ"
" घरी? घरी कशाला? हो... हो... घरी.... घरी.... या ना.... जरूर या.... फॅमिलीला....... " शृंगारपुरे गदगदून रडायच्या बेतात.
ऑफिसमधले वातावरण चमत्कारिक कुंद झाले. तसें मी सगळ्यांना आपापल्या जागेवर पिटाळले आणि शृंगारपुरेच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागलो. पण माझ्याही मनांत एक शंका, एक संभ्रम निर्माण झाला होताच. वास्तविक त्याच्याच काय पण कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे समजण्या इतके आम्ही सगळेच सभ्य होतो. परिपक्वही असूं कदाचित. पण शृंगारपुरेचे हे असले वागणे कोड्यात टाकणारे होते. विशेषत: त्याच्या फॅमिलीचा विषय निघाला की तो कमालीचा खुले पण लगेचच आपले पंख मिटून घेत असे. सतत तो कांही तरी लपवतो आहे असा भास होत असे. तशा त्याच्या आणखीही कांही गोष्टी कोड्यात टाकणाऱ्याच होत्या. कार्यालयीन माहितीत त्याने सिंहगड रोड वरील हिंगणे गांवाचा पत्ता दिलेला होता. मुंबईहून पुण्याच्या हडपसर सारख्या ठिकाणी नौकरी करायला आलेला हा माणूस हिंगण्यासारख्या सोळा सतरा किलोमीटर दूरच्या ठिकाणी कां राहतो? खरं म्हणजे त्या काळात त्याला हडपसरच्या जवळपासही एखादी चांगली निवासी जागा अगदी सहज मिळाली असती. ज्या काळात आम्हाला एक चांगली सायकल विकत घ्यायची म्हणजे दिवाळीच्या बोनसची वाट पाहावी लागे त्या काळात हा स्कूटरवर कामाला येत असें. त्याच्या कामांत तो तसा साधारणच पण बरा होता. पण कमालीचा नीटनेटकेपणाच्या संवयीचा. लहानसा कागद लिहायला घेतला त्याला तरी समास पाडल्याशिवाय तो लिहायला सुरुवात करीत नसे. त्याच्या या सगळ्या गोष्टी बाजूला सरून त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.
पुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक राहत असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पाहताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि "बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपऱ्यात कांही पादत्राणाचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला.
" घ्या सर. पाणी घ्या. " शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
" शृंगारपुरे... वहिनी..? " मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.
" हां! त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय. "
" कधी? काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत. "
" नाही. बोललो नाही.. पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून..... "
" अच्छा, अच्छा! कांही विशेष? "
" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे"
" मंगळागौरीला? आत्ता? मार्गशीर्षांत..?
" ओह्! आय एम सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला. "
" म्हणजे? "
" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस् हर. "
"............. "
" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपऱ्यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ"
" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो.. "
" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन् दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा. "
असं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिंदी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पाहत होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.