दिवसभराच्या कष्टांनंतर
त्याची पावलं घराकडे घरंगळतात
सरकत सरकत वस्तीपाशी पोहोचतात
पाहतो तर त्याची वस्तीच गायब झालेली
फक्त दगड विटांचा ढिगारा
आणि एक भयाण शांतता साकळलेली
स्वतःचंच घर शोधून गलितगात्र होताना
नजरेला पडते,
त्याची बायको, भकास भविष्याचं प्रश्नचिन्ह
चेहऱ्यावर घेऊन सुन्न बसलेली
त्याची मुलं, तुटक्या वीटा रचून घरघर खेळणारी
आणि त्या उध्वस्त अवशेषातून डोकावणाऱ्या
काही वस्तू ओळख सांगणाऱ्या
चेपलेला हंडा, तुटक्या चपला वगैरे
मग त्याचं तिच्याजवळ बसणं
हात हातात घेऊन तिला सावरणं
त्याच्या धीराच्या स्पर्शाने
मोकळे झालेले तिचे हुंदके
अस्पष्ट होत होत थांबतात
तोवर अंधार दाटून येतो
मनात आणि भोवतालीसुद्धा
उपाशीपोटीच, विटांच्या गादीवर
त्याचा डोळा लागतो
नवी झोपडी ठोकण्यासाठी
नव्या वस्तीच्या शोधात
सकाळी पुन्हा निघायचं असतं
स्वप्नं पायदळी तुडवत
काडी काडी जमवून
घरटं पुन्हा बांधायचं असतं