वलय...!

आमचं वलय तुझ्यात शोधायचा
आम्ही करतो केविलवाणा प्रयत्न...
आणि हीच आमची लाचारी,
आमच्या भक्तीशी ठेवते सापत्न !

कदाचित म्हणूनच ती लाचारी
भक्तीआधी तुझ्याकडे पोहोचते
अन् असं वाटतं की
तीच तुला जास्त रुचते !

आणि या पूर्वग्रहामुळेच
आम्ही भक्तीला देतो तिलांजली...
आमच्या अगतिकतेचा करतो नैवेद्य
आणि लाचारीची वाहतो पुष्पांजली !

आश्चर्य म्हणजे,
याच लाचारीमुळं दिसतं वलय...
पण तुझ्याच भोवती; स्वतःभोवती?
दिसतो फक्त अधःपाताचा प्रलय !

आणि, तुझ्याभोवतीचं वलय पाहतानाही
गुंतून पडतो आम्ही फक्त परिघामध्ये
अन् केंद्रबिंदू असलेला तू येतोस,
उभा किंवा आडवा ठसा होऊन ललाटरेषांमध्ये !

... तू तरी काय करणार?
किती वेळा अवतार घेणार?
'योगक्षेम वाहीन' असं म्हणून फसलास रे!
आता किती जणांना तुझ्या लोकी नेणार?

हे एवढंच ओळखलंय आम्ही स्वतःला...
किमान म्हणून प्रसन्न झालासच तर,
"आमच्या वलयात तुझा केंद्रबिंदू लाभेल"
एवढाच  दे वर !