उरतो कोणी कोरडा इथे भिजून एखादा
दुसऱ्यासाठी पेटव म्हणतो विझून एखादा
नियमालाही शेवट असतो असे म्हणे कोणी
अपवादाशी झुंजत बसतो म्हणून एखादा
जगणे ना बेवारस इतके अजून मित्रांनो
मरणाऱ्याची जात विसरतो अजून एखादा
क्षितिजालाही मोह पडावा अशात एकांती
स्वर लागावा त्यापलिकडचा जमून एखादा
शरदाच्या चंद्रास मिरविशी सखे तुझ्या भाळी
हतभागी तारा मग चळतो तिथून एखादा
ठरले होते शब्द भरजरी जपायचे माझे
जगण्याच्या फंदात घसरतो चुकून एखादा
निजली माया घेउन सगळ्या खुशाल स्वप्नांना
उडतो पक्षी सावध घरट्यामधून एखादा