ज्ञाताज्ञातामधील अंतर : एक पुसटशी रेघ
अव्यक्ताच्या क्षितिजी घुमतो एकाकी मनमेघ ।
स्पंदनात जाणवे कशाची गूढ अनामिक ओढ?
अपूर्ण आणिक परिपूर्णाची एक सनातन तेढ ।
कधी दुरुनशा ऐकू येती अशा कुणाच्या हाका?
भूत-भविष्यातील समेचा वर्तमान हा ठेका ।
तरी न संपे जिज्ञासा ह्या फसव्या आयुष्याची
मनमेघातुन उठते-मिटते ऊर्मी आवेशाची ।
ज्ञाताज्ञातामधील अंतर पुसट; तरी ते 'असते'
या 'असण्याने' अर्थ जिण्याला... म्हणून जीवन हसते ॥