दोन संघटना- नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आणि नात्सी

माणूस हा प्राणी संघटना स्थापण्यामागे कोणते विचार/उद्दिष्टे बाळगून ती स्थापतो आणि त्या विचारातून पुढे काय जन्माला येते ह्यातला टोकाचा परिणाम हा चक्रावून टाकणारा आहे आणि हा विरोध अत्यंत विदारकपणे समोर यावा ह्यासाठी ह्या दोन संघटनांचे उदाहरण घेतले आहे.- [हा लेख पुर्वी मी मिपावर दिला होता. मिपाकर चतुरंग ह्यांनी ह्या लेखात हे उद्दीष्ट्य असावे असे सुचविले होते.]
*******
१३ जानेवारी१८८८ रोजी ३३ संशोधक आणि शोधक (एक्सप्लोरर) कॉसमॉस क्लब, वॉशिंग्टन येथे जमले व त्यांनी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना केली. ह्या मंडळींना कळून चुकले होते की, जगात अजुन खूप काही शोधून काढायचे बाकी आहे व मानवाला पृथ्वीबद्दलची एकंदरीतच माहिती खूपच त्रोटक आहे. केवळ स्थानिकांकडे असलेली माहिती व आत्तापर्यंत जेथे मानव जाउच शकला नाही तेथे जाउन नवी माहिती जगासमोर आणणे अशा दोन्ही बाबी महत्वाच्या मानुन ह्या सोसायटीची गुढी उभारली गेली.
ह्या सोसायटीचे उद्दीष्ट्य "भौगोलिय माहितीचा विस्तार व प्रसारण" असे ठरले. सोसायटीची घटना तयार करुन गार्डीनर हबर्ड हे पहिले अध्यक्ष झाले. ह्याबद्दलची अधिक माहिती विकीवर वाचयला मिळते.
आज ह्या सोसायटीचा जो वटवृक्ष झाला आहे त्याच्या शीतल छायेखाली आपल्याला जगाबद्दल जी नवनवी काही माहिती मिळते ती उत्कंठापूर्ण असते ह्यात शंकाच नाही. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा वाचक वर्ग जगात सर्वदूर पोहोचला आहे व कोट्यवधी लोक त्याचे वाचक, श्रोते व प्रेक्षक आहेत.
********
दोन वर्षांपुर्वी म्युनिक येथे २ आठवडे "कष्टंबर"कडे जायला मिळाले म्हणून खुष झालो. जर्मनीत मॉन्शेग्लॅडबाख (ड्युसल्डॉर्फजवळ) येथे पुर्वी अनेक महिने वास्तव्य होते पण इथे जाण्याचा योग आला नव्हता. माझ्यामते जगात मी पाहिलेल्या शहरांपेक्षा ह्या शहरात इतिहास, आधुनिकता, कला, साहित्य, इंजिनीअरिंग, सायन्स वगैरे जितके अनुभवायला मिळते त्याची तुलनाच होउ शकत नाही. मोत्सार्टतर शेजारचाच- ऑस्ट्रीयाचा. म्युझियममधे लिओ द विन्सी, पिकासोची खरी चित्रे/शिल्पे पाहिल्यावर रोमांच येतात. अडॉल्फ हिटलरचे हे गांव व कट्टर जर्मन म्हणजे काय ते येथेच अनुभवावे. पुण्यातल्या अनेक आयटीवाल्यांना येथे जाता आले व अनेक तेथे आहेत. मराठी लोकांनी एक वेब्साईट करुन एकमेकांच्या संपर्कात असतात. मला एकतरी मराठी तरुण प्रवासात रोज भेटायचा. बसस्टॉपवर मराठी कानावर यायचे व सहजपणे गप्पा सुरु व्हायच्या. इतके मराठीपण पुर्वीच्या जर्मेनी वारीत कधीच अनुभवायला मिळाले नाही. - पण ह्यासगळ्याबद्दल नंतर कधीतरी!
अडॉल्फ हिटलर ज्या कॅफेमधे बसुन त्यानी नात्सी संघटना बांधली तो कॅफे आता पर्यटकांचे आकर्षण आहे. तो पाहिल्यानंतर सहजपणे मनात विचार आला की जवळचा एखादा कॉन्सट्रेशन कॅम्प पहायचा. पण अंगावर शहारा आला. अगदी भुताखेतांचे विचार मनात आले. ज्यांचे हालहाल करुन मारण्यात आले त्यांचे तळमळणारे आत्मे तेथेच घुटमळत असतील असा एक विचार आला व मी तेथे जाण्याचा विचार झटकून टाकला.
पण जसजसे मी म्युनिकला पाहुन घेतले तसतसे मला त्याठिकाणी जाउन यायचेच असे वाटायला लागले. तरीसुद्धा आनंदावर विरजण नको म्हणुन अगदी पुण्याला परतायच्या आदल्या दिवशी जायचे ठरवले.
म्युनिकपासुन जवळचा कॅम्प डकाउ ह्या गावांत आहे. खूपच छोटे गाव आहे व रस्त्यावर फारशी गर्दी नव्ह्ती. स्टेशनवर उतरल्यावर कॅम्पवर जाण्यासाठी बस कुठे मिळेल हे विचारण्यासाठी कोणालातरी शोधत असतांना दोन आफ्रिकन दिसले.
त्यांना विचारल्यानंतर दोघेही हसले. मी प्रश्नांकित चेहऱ्याने पाहिल्यानंतर एकजण म्हणाला, "काही खाल्ले आहे का?"
मी म्हंटले, "का?"
तो, "तुला कॅम्प पाहिल्यावर जेवण जाणार नाही!" "ओकारी येते, मन विषण्ण होतं"... मी प्रचंड विचारात पडलो...चल्बिचल झाली..खरंच जायचे आहे ना कॅम्प पाहायला की असेच मागे फिरायचे?
पुढे म्हणाला, "पण तू कॅम्प जरुर पहा...सगळ्यांनी पहायलाच पाहिजे..." त्यांने शांतपणे मला बस कोणती पकडायची व कोठे उतरायचे ते सांगितले.
कॅम्पचे वर्णन मी करणार नाही. तेथे काय बघायला मिळाले ते सांगण्यासारखे नाहीच. विकिवर वाचा- http://en.wikipedia.org/wiki/Dachau_concentration_camp. डकाउ गुगल मॅपवर दिसते - कॅम्प दिसतो तो पहा.
इतकेच सांगता येईल की, ज्युंनी ज्या यातना भोगल्या त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. आता त्यांनी कॅम्पच्याच प्रांगणात आता एक चर्च बांधले आहे. तेथे मी जाउन प्रार्थना केल्यानंतर माझे मन शांत झाले.