मखमली धुकं लपेटून,गाढ झोपली होती सृष्टी
रमली होती स्वप्नात, साऱ्या दिनचरांची दृष्टी
पहारा देत होते, नभातले लुकलुक तारे
रातकिड्यांची गस्त, आसमंत किरकिरे
नाजुक मिठीत फुलांच्या, भ्रमर हरवलेले
पात्यावर गवतांच्या, दंवबिंदू विसावलेले
तिथून शीत समीर, हलकेच वावरे
आणि तो वृक्ष, आपली जीर्ण पानं सावरे
तेवढ्यात पूर्वेला एक प्रकाशदूत प्रगटला
संदेश त्याच्या आगमनाचा, सर्वांना देत सुटला
...
पहारेकरी झाले पसार, गस्त झाली बंद!
पूर्वा उजळली, फेकला कुणी तांबडा रंग
स्वप्नातून परत फिरली, मनांची अवजड पावले
आळोखेपिळोखे देत, डोळे करून किलकिले
दूर गावात एका कोंबड्याने बांग दिली
"उषःकाल झाला".. "उषःकाल झाला"....... पाखरे किलबिलली!
------------------------------------------------
प्रकाश