मराठीमधून "बॅचलर ऑफ मास मीडीआ" (बीएमेम) : दीपक पवार यांचा प्रतिसाद

संदर्भ : मनोगतावरील हा लेख आणि त्यावरील चर्चा :

http://www.manogat.com/node/16952

खाली दीपक पवार यांचा प्रतिसाद देत आहे :

मनोगत वरील मित्रानो,

" लोकसत्ता " तल्या माझ्या लेखाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन : पूर्वक धन्यवाद. मागच्या आठवड्यात शासनाची परवानगी मिळविण्यासाठी आणि मग त्याआधारे विद्यापीठातली कार्यवाही वेगात होईल यासाठी प्रयत्न झाले. आता यावर्षी थोडे उशिरा का होईना, पण मराठी बीएमएम सुरू होईल. याच काळात घरात लग्न असल्याने ईमेल पाहणं, उत्तर देणं हे करू शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व.

माझ्या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया या कामाचं स्वरुप समजून घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आहेत. काही या कामात कशी मदत करता येईल याची विचारणा करणाऱ्या आहेत. तर काहींना या कामाबद्दल आक्षेप आहे. काही वेळा मूळ व्यक्तीच्या नावाने तर काही वेळा टोपण नावाने प्रतिक्रिया आल्या आहेत. शक्य तिथे वैयक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वप्रथम पार्श्वभूमी :

गेली बरीच वर्षे बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) हा मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्णत : इंग्रजीतून सुरू होता. तो मराठीतून आणण्यासाठी मराठी पत्रकाराचं शिष्टमंडळ मराठी अभ्यास केंद्राने नेलं. त्यानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना व मराठीकरण सुरू झालं. मूळ इंग्रजी अभ्यासक्रमात मराठी, महाराष्ट्र यांना अजिबात स्थान नव्हतं. कारण तो जाहिरात कंपन्यांना बॅकऑफिसला लागणारी मुलं मिळावीत या उद्दिष्टाने बनवला होता. विद्यापीठात अनेक अडथळे पार करत तो मंजूर झाला. आता शासनानेही त्याला मंजूरी दिलीय. आता इंग्रजी, मराठी दोन्ही अभ्यासक्रम सारखेच आहेत.

नगरीनिरंजन, आजानुकर्ण यांचा या प्रयत्नांना पाठिंबा आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. अभ्यास केंद्राच्या विविध कृतिगटांची माहिती या पत्रासोबत दिली आहे. तसेच इतर काही उपयुक्त माहितीही दिली आहे. त्यावरून आपण आमच्याशी कशा पद्धतीने जोडून घेऊ शकता याचा आपल्याला अंदाज येईल.

राज नंदा यांनी प्रतिष्ठित लोकांकडून एक पत्रक काढावं असं सुचवलंय. असं एखादं पत्रक मराठीच्या एकूण प्रश्नांबाबतच काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बीएमएमच्या मुद्यावर मराठीतल्या ज्येष्ठ पत्रकार, संपादकांचं शिष्टमंडळ नेलंच होतं. आता बीएमएमचा प्रश्न सुटलाच आहे. इतर मुद्यांवर असं पत्रक काढण्याचा जरुर प्रयत्न करू.

सौरभ यांच्यासाठी मी पार्श्वभूमी आधीच स्पष्ट केली आहे. दोन वेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे ज्याला इंग्रजी बीएमएम शिकायचंय त्याला तो नक्कीच शिकता येईल. पण त्यात संभाषण कौशल्य आणि अनुवाद कौशल्य या दोन विषयपत्रिकांमध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याला आणि महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण यांचा समावेश होण्याला झालेला विरोध याचं मराठीद्वेष्टेपण असंच वर्णन केलं पाहिजे. विरोध करणाऱ्यांमध्ये अमराठी आहेत हा योगायोग नाही. आपण दिलेला पोलिटिकली स्मार्ट, डिप्लोमॅटिक आणि सटल राहण्याचा सल्ला योग्यच आहे. पण काहीवेळा त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीही वापरून पाहाव्या लागतात. सनदशीर लढ्याच्याच नव्या पद्धती तयार कराव्या लागतात.

दिलीप वसंत सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निकालात मराठी मतांची विभागणी झाल्याचं दिसून आलं. पण ते अपरिहार्य होतं. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या स्पर्धेमुळे मराठीच्या अजेंड्याचा विस्तार होणार असेल तर ते चांगलंच आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीतलं चित्र वेगळं असेल.

भविष्यात संघर्ष न करता असे बदल सहज होतील तेव्हाच या प्रयत्नांना सर्वार्थांने यश मिळाले असं म्हणता येईल या विजय यांच्या मताशी मी सहमत आहे. त्यासाठी धोरणात्मक बदल व्हावेत असाच आमचा प्रयत्न आहे.

सुधीर कांदळकर यांनी राममोहन खानापूरकरबद्दल दाखवलेल्या आस्थेबद्दल मन : पूर्वक धन्यवाद. राममोहनला अभ्यासकेंद्र अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही. रामने अभ्यासमंडळाचा सदस्य म्हणून त्याच्या महाविद्यालयाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. अशावेळी त्याने तिथे परत जाणे म्हणजे रोजच्या रोज विरोधाला तोंड देणे. व्यक्तिगत पातळीवर ते अत्यंत मन : स्ताप देणारे आहे. शिवाय नव्याने सुरू होणाऱ्या मराठी बीएमएम साठी तो प्रयत्न करतोच आहे. आपण जर मुंबई किंवा परिसरात असाल तर आमच्या उपक्रमांत सक्रीय सहभागी झालात तर आवडेल.

एमबीबीएस च्या अभ्यासक्रमाचं मराठीकरण का होऊ नये? (संग्राहक यांच्या प्रतिक्रियेच्या संदर्भात ) एकेकाळी असे अनेक अभ्यासक्रम मराठी आणि उर्दूतूनही होते. उच्चशिक्षण आपल्या भाषेतून उपलब्ध होणे हा ती ज्ञानभाषा होण्याच्या मार्गातला महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या इंग्रजी माध्यमात शिकवणाऱ्या आपल्या प्राध्यापकांना मराठीद्वेष्टे म्हणण्याचा प्रश्न नाही. पण सर्व प्रगत ज्ञानशाखांमधलं ज्ञान मराठीतून उपलब्ध व्हावं यासाठी आमचा आग्रह आहे.

या प्रकारच्या चळवळीला पोषक संदर्भसाहित्याचं विश्लेषण करणे, आवडलेल्या उपक्रमासाठी (महाराष्ट्रात असाल तर ) वेळ देणे किंवा याप्रकारच्या चळवळींना आर्थिक पाठिंबा देणे अशा विविध मार्गांनी आपण आमच्याशी जोडून घेऊ शकता. आपण ज्या राजकीय नेत्यांचा उल्लेख केलाय त्यातल्या अनेकांची मुलं मराठी माध्यमात शिकत नाहीत, शिकलेली नाहीत याची आम्हांला कल्पना आहे. पण कदाचित त्यामुळेच त्यांना मराठीची बाजू उघडपणाने घेणं भाग पडतं. समर्थनाच्या पत्रांनी त्याचं भाषेवरचं प्रेम सिद्ध होत नाही हे खरंच आहे. पण त्यांना पूर्ण डावलून सुद्धा पुढे जाता येणं कठीण आहे. त्यामुळे शक्य तिथे सहकार्य, आवश्यक तिथे विरोध असं करतंच पुढे जावं लागतं.

शिक्षणाच्या माध्यमाच्या निवडीसाठी भाषेविषयीचं प्रेम हा एक निकष आहेच. पण त्यामागे शिक्षणशास्त्र व मानसशास्त्राचा आधारही आहे. मराठी साहित्यावर इंग्रजीतून पीएच. डी. जरुर व्हावी. पण इंग्रजीतल्या मोठ्या लेखकांवर मराठीतून संशोधन झालं तर मराठी वाढेल. इंग्रजी भाषेत भर घालण्यासाठी जगभरातून लोक प्रयत्न करताहेत. मराठीसाठी मात्र आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत. भाषा – प्रेम मूलत : शिक्षणाने जगते. साहित्य – व्यवहार हा एकूण भाषा व्यवहारातला महत्त्वाचा पण छोटा भाग आहे. भाषा व्यवहारातून संपली तरी लोक त्यातून साहित्यनिर्मिती करू शकतात. (उदा० संस्कृत, पाली ) मराठीचं असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे.

बदलत्या युगात प्रगती करण्यासाठी मराठीसह इंग्रजीचीही आवश्यकता आहे. मराठी टाळणं हे प्रगतीचं लक्षण आहे असं आम्ही मानत नाही. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजीतून शिकणं या दोन पूर्णत : वेगळ्या गोष्टी आहेत. ( लेखकाने एनसीईआरटीने प्रकाशित केलेला प्रा०यशपाल समितीचा अहवाल पाहायला हरकत नाही. )

मुलांनी इंग्रजीतून शिक्षण घेऊ नये असं आमचं म्हणणं नव्हतं आणि नाही. मराठीतून बीएमएम शिकणाऱ्या मुलांनाही अनिवार्यपणे इंग्रजी शिकायला लागावं अशी सोय मुद्दामच या अभ्यासक्रमात केली आहे. मराठीतून शिकणाऱ्या मुलांनी इंग्रजीपासून दूर जाऊ नये असं हेतूत : केलं आहे. त्यामुळे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रश्नच नाही. पवार, ठाकरे कुलोत्पन्नांची प्रमाणपत्रं नसती तर यशस्वी व्हायला वेळ लागला असता, पण यश मिळालंच असतं. ज्या अभ्यासक्रमाबद्दल फारशी कल्पनाच नाही तो फालतू आहे असं म्हणून त्याची हेटाळणी करणं हे पूर्वग्रहदूषित मानसिकतेचं लक्षण आहे. राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल प्रतिक्रिया-लेखकाला आक्षेप असतील तर त्याने त्यांच्या पक्षाच्या संकेतस्थळावर ते थेट नोंदवायला हरकत नाही. पण आमच्या कामातल्या यशाचा राज ठाकरेंच्या आंदोलनाशी बादरायण संबंध जोडण्यासाठी कल्पनाशक्तीला ताण देण्याचं कारण नाही. भौतिक प्रगतीसाठी स्वदेश सोडणाऱ्यांनी ते जिथे आहेत तिथून भाषासंवर्धनाचं काम केलं तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे? परदेशस्थ मराठी माणसांकडून अजूनही खूप अपेक्षा आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी साहित्य –विकास आणि भाषाविकास यातला फरक लक्षात घेणे.

आपणां सर्वांशी संवाद साधून आनंद वाटला. आपल्या प्रतिसादाचे सातत्यपूर्ण सहकार्यात रुपांतर होईल असा विश्वास वाटतो. काहीजणांच्या प्रतिक्रियांवर उत्तर द्यायचं अनवधानाने राहून गेलं असेल तर क्षमस्व. आपण माझ्याशी दुवा क्र. १वर संपर्क साधू शकाल. आपण महाराष्ट्रात राहत असाल तर सक्रीय कार्यकर्ते म्हणून आमच्याशी जोडून घेऊ शकाल. आर्थिक सहकार्य शक्य असेल तर धनादेश " मराठी अभ्यास केंद्र " या नावाने काढावा. आमचं काम निष्ठेने आणि पारदर्शकपणे चालते आणि चालेल याची हमी देतो.

आपला स्नेहांकित,

दीपक पवार

अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र