वांझ असावी सून आपली सासू म्हणली पोराला
तीन वर्षं झाली लग्नाला फूलच नाही वेलाला
मुलगा नव्हता शिकलेला अन आई नव्हती शिकलेली
सून सुशिक्षित होती पण ती बावरूनशी बसलेली
तिला अशी चर्चा आताशा रोजच लागे ऐकाया
सासूने उद्धार करावा, नवरा लागे कोसाया
आवडेल कुठल्या बाईला वांझ तिला जर नाव पडे?
निसर्ग आहे, नशीब आहे, भाग्य असे तर सर्व घडे
झोपडीत ही रोजच चर्चा उठल्यापासुन झडणारी
सारी गल्ली ऐकत होती भांडाभांडी घडणारी
माहेरी म्हातारी आई, वडील नव्हते पोरीला
बाकी कोणीही नव्हते माहेरी सख्खे पोरीला
बाराव्वीनंतर पोरीचे लग्न दिले लावून इथे
अशिक्षित नवऱ्याने केले मातेरे आणून इथे
'नोकरी तुला शोभत नाही, घरकामे तू उरक जरा'
'आल्यागेल्याशी बोलावे शोभत नाही, सुधर जरा'
एकच खोली, त्यातच त्यांच्या मधुचंद्राचे आटपणे
सासू खोकत जागवणे अन नवरा औषध चाटवणे
तीन वर्षं झाली, लोकांची कुजबुजही वाढू लागे
नवऱ्याला ते सहन होइना तोही ते काढू लागे
सासू तर चवथ्या महिन्यांनी पट्टा ओढे तोंडाचा
देव देव अन नवसही झाले पत्ता नाही बाळाचा
चिडचिड वाढत गेली, कोणी उपाय सांगे रोज नवे
कोणाला पाहिजेत पैसे, कोणाला बस मान हवे
छळ आता तर रोजचाच, कामावर कामे वाढावी
शिव्याशाप, उद्धार, चुकुनशी थप्पड मधुनी लागावी
आज शेवटी, वेळ काढुनी बसले दोघे चर्चेला
सून आत ऐकत होती उद्धार, चेहरा रडवेला
सासू म्हणली एकच आहे उपाय असल्या प्रश्नावर
स्वामी करती पूजा, देती अंगारा या प्रश्नावर
मुलगा बोले 'कुठले स्वामी, किती खर्च आहे त्यांचा? '
सासू बोले 'उपाय यावर खूप स्वस्त आहे त्यांचा'
टेकडीवरी बसती ते अन रांग लावती लोक तिथे
प्रश्न विचारी, उत्तर मिळते, हात जोडती लोक तिथे
एकच साधी पूजा असते, भांग जराशी घेती ते
प्रश्न वेगळे, उपाय त्यावर वेगवेगळे देती ते
शेजाऱ्यांच्या नात्यामध्ये अनुभव आहे आलेला
सात आठ वर्षांनी त्यांना मुलगा आहे झालेला
नवरा म्हणला ठीक असे मी जातो घेउन आज हिला
आतुन येत म्हणाली पत्नी उपाय असले नको मला
विरोध तेथे कोणालाही चालणे मुळी शक्य नसे
सासू, नवरा ओरडून बोली 'तू ऐकावेस असे'
रडारडी, अन गोंधळ झाला, फटके पडले थोडेसे
सुजला गाल तिचा, कानातुन रक्त निघाले थोडेसे
तरी म्हणाली 'वैद्यकीय चाचण्याच केवळ घ्याव्या हो'
'असले स्वामी खोटे असती माहीत आहे मजला हो
नवरा बोले शिक्षणे तुझी नको दाखवू आम्हाला
चुलीपुढे अक्कल बाईची, नकोस शिकवू आम्हाला
धाकदपटश्याने घाबरली, तयार झाली जायाला
नवरा होता वेगे चालत, जोर हिच्या ना पायाला
स्वामी होते बसलेले अन आज कुणी आले नव्हते
हेच पोचले दोघे तेथे, भक्त कुणी चेले नव्हते
स्वामी बोली ' काय बाळ संकट आले आहे तुजवर? '
नवरा बोले ' अपत्य नाही, तीन वर्षंही झाल्यावर'
स्वामी हसले, पुढे म्हणाले, 'तपासण्या केल्या तुम्ही?'
नवरा बोले 'केल्या साऱ्या, वाचवाल आता तुम्ही'
स्वामी बोले ' काय निघाले? दोष वगैरे आहे का? '
नवरा बोले 'दोष हिच्यामध्ये नाही, पण मग हे का? '
स्वामी बोली ' तुला स्वतःला तपासले होतेस कधी? '
नवरा बोले ' पुरुषामध्ये दोष कुठे आहेत कधी? '
स्वामी म्हणले 'पूजा आहे एक जरा अवघड थोडी'
नवरा बोले 'ठीक असे, पण करून घ्या लवकर थोडी'
'हिला आत पाठव, या येथे थांब एकटा बेटा तू'
नवरा बोले 'आत जा अता पूजा आहे, तेव्हा तू'
पत्नी बोले ' मला नको ही पूजा बीजा, काहीही'
नवरा बोले ' सुजवू का हा दुसरा गाल तुझा मीही? '
घाबरून ती आत पोचली, दोन तिथे चेले होते
मटणाच्या थाळ्या होत्या अन मद्याचे पेले होते
स्वामी बोली ' बैस मुली, या येथे पूजा मांडूया'
ती बोले ' नवऱ्यातच माझ्या दोष असे हो, जाउया'
स्वामी बोले ' जाणुन आहे, बाप कधी ना होई तो'
'आम्हाला अंतर्ज्ञानाने सारे काही सांगी 'तो' '
त्यानंतर ते चेले उठले, एक निघे बाहेर जसा
एक त्यातला दार लावुनी आत राहिला गप्प असा
स्वामींनी मग हात घातला अब्रूवर त्या पोरीच्या
ओरडली तेव्हा चेला तो गाठी मारे दोरीच्या
नवरा धावे तेव्हा दुसरा चेला बोले थांबा हो
पूजा थोडी विचित्र आहे धीर जरासा ठेवा हो
तोंडामध्ये बोळा घाली, पापी स्वामी उपभोगी
चेला तेव्हा लाळ गाळुनी नजरेने सारे भोगी
अर्ध्या तासानंतर झाली शांत वासना स्वामीची
सुवर्णसंधी चेल्यांनाही मिळे ही कृपा स्वामीची
सोडता तिला, भोवळ आली, धक्का होता बसलेला
ताकद बोलायाची नव्हती, डावच सारा फसलेला
हासत होते चेले, स्वामी, हाडुक चोखत, पीताना
'अता तुला जातील दिवस' हे सागत होते हसताना
ती उठली, पण दाराच्या बाजूला ती गेली नाही
उलट्या बाजूला गेली जिकडे कोणीही ना पाही
त्या बाजूला दरी पाहुनी धीर तिने गोळा केला
उडी मारुनी देहाचा अपुल्या चोळामोळा केला
जसे पाहिले स्वामीने ते घाबरले स्वामी, चेले
'काय कराया गेलो आपण, काय बरे आपण केले?'
त्याच दिशेने दरी उतरुनी पळून गेले सारे ते
नवऱ्याला पत्ता नाही की काय काय जे झाले ते
प्रेत मिळाले, सुटका झाली सासूची अन नवऱ्याची
रडले थोडे जगासमोरी, पुन्हा बांधणी लग्नाची
त्या जागी आता जी दुसरी आहे ती सोसे सारे
स्वामी दुसऱ्या गावी आहे, विस्मरणी गेले सारे