रंगभूमीला पाय लावण्याचे धाडस ( किंवा पाप) माझ्याकडून प्रथम घडले ते मलाही नकळत ! अर्थात त्यानंतर कळून सवरून रंगभूमीवर प्रवेश करूनही त्या पापाचे क्षालन मात्र मी करू शकलो नाही त्याचीच ही कहाणी !
आमच्या संस्थानचे अधिपती मा. बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांना साहित्य,ललितकला यांची आवड आणि गोडी होती.ते स्वत: उत्तम चित्रकार होते,उत्तम कीर्तन करीत आणि एका वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलनावे अध्यक्षपदही त्यानी भूषवले होते.त्याना व्यायामाची आवड होती आणि सूर्यनमस्काराचे ते खंदे पुरस्कर्ते होते.(त्यांच्या सूर्यनमस्काराच्या वेडावरच आ.अत्रे यांनी " साष्टांग नमस्कार" हे नाटक लिहून त्यांचा रोष ओढवून घेतला होता त्यामुळे अनेक साहित्यिक आमच्या गावी निरनिराळ्या प्रसंगी येऊन गेले पण आ. अत्रे यांना मात्र महाराजानी कधी बोलावले नाही.महाराजांच्या निधनानंतरच ते आमच्या गावी आले ते "श्यामची आई " या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी !)
महाराजांच्या या कलाप्रेमामुळे संगीत,नाट्य,चित्रकला या सर्वांना संस्थानात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. वर्षातील एक महिना राजवाड्यातील दरबार महालात कीर्तनमहोत्सव होत असे तर नवरात्र मंडप या त्यावेळी भव्य वाटणाऱ्या मंडपात निरनिराळ्या नाटकांचे प्रयोग होत असत. त्यातील एका नाटकात महाराजांच्या कुटुंबातील मुले आणि मुली सह्भागी होत.ही मुलेमुली कीर्तनसमारंभातही भाग घेत. अभिनयाचे चांगलेच अंग त्यांच्यापैकी काहीजणाना होते.त्यामुळे ही नाटके खूपच रंगत आणि गावातील आबालवृद्ध त्यांचा उत्साहाने आनंद लुटत.नाटकात काही हौशी प्रजाजनांना पण भाग घेता येत असे.आणि अशी हौशी मंडळी खरोखरच अतिशय उत्तम अभिनय करत.
एका वर्षी या समारंभात " आग्र्याहून सुटका " हे नाटक सादर करण्यात आले. विशेष म्हणजे त्या नाटकात माझ्या वडिलांनी आणि मोठ्या बहिणीने पण काही किरकोळ भूमिका निभावल्या होत्या.बहीण आणि वडील त्या नाटकात असल्यामुळे आणि मी तीन चार वर्षाचा लहान मुलगा असल्याने मला रंगभूमीच्या अंतर्भागात प्रवेश होता.त्यावेळीच्या नाटकात निरनिराळ्या दृश्याचे पडदे असत.आणि प्रवेशाच्या मागणीप्रमाणे योग्य तो पडदा गुंडाळला अथवा सोडला जाई.एका वेळी कधीकधी दोन तीन पडदे सोडलेले असायचे आणि आवश्यकतेनुसार त्यातील सर्वात बाहेरील पडदा गुंडाळला जायचा.दोन तीन पडदे सोडलेले असल्याने मधल्या जागेतून इतरेजनांची आवकजावक चाले.अशा एका प्रवेशाचा पडदा वर घेतला जात आहे हे लक्षात न आल्यामुळे तो पडद्यामागील मोकळा भाग आहे असे समजून मी त्या मधल्या भागातून एका विंगमधून पलीकडच्या विंगेत जात असतानाच पडदा वर गेला आणि मी रंगभूमीवरूनच पलायन केल्याचे सर्वांच्या नजरेस पडले.आता हा माझा रंगभूमीवर चुकून झालेला प्रवेशही महाराजांनी अचूक हेरला. दुसऱ्या दिवशी नाटकात भाग घेतलेल्या नागरिकांना वाड्यातल्या भोजनाला बोलावले तेव्हा त्यांनी वडिलांना " मास्तर तुमच्या मुलालाही घेउन या बरका,त्यान पण रंगमंचावर प्रवेश केलेला आम्ही पाहिला आहे." असे सांगितले. माझे रंगभूमीवरील पदार्पण हे असे मला नकळत घडले होते.
या पदार्पणाच्या जोरावर पुढे आपण रंगभूमीचे पांग फेडावे असे मात्र मला वाटण्याचे कारण नव्हते शिवाय आजच्यासारखा निरनिराळ्या वाहिन्यावरील सान थोर कलाकारांचा गुणवत्ताशोध त्या काळात नसल्यामुळे आपल्या पाल्याच्या अंगातील कलागुणाविषयी पालक अगदीच उदासीन असायचे इतके की खरोखरच कलागुण असलेल्या मुलांना घरातून पळून जाऊनच आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे लागायचे त्यामुळे शाळेतील नाटकात काम करण्यासाठी मुलांना अक्षरश: बळेबळे घोड्यावर बसवावे लागायचे.आणि त्यात आमच्यासारखे वर्गात हुषार म्हणून नावाजलेले विद्यार्थी सापडायचे.मी अभ्यासात हुषार असल्याने नाटकातही मला भाग घ्यावाच लागला.कदाचित मी निदान आपली नक्कल तरी चोख पाठ करीन याविषयी शिक्षकांना असलेल्या खात्रीचाही त्यात महत्वाचा भाग असेल.
मला आठवते तसे "कृष्ण सुदामा" या एकांकिकेत ऋषिकुमाराची भूमिका माझ्या वाट्याला आली होती.अर्थातच त्या भूमिकेला अनुसरून अंगावर धोतरच काय ते होते,उत्तरीय वगैरे ऋषिकुमाराला परवडण्याची शक्यता नव्हती.माझी नक्कल चोख पाठ होती पण ते नोव्हेंबर डिसेंबर असे थंडीचे दिवस होते आणि शाळेच्या पुढील पटांगणावर रंगमंच उभारलेला होता. त्यामुळे रंगमंचाबर प्रवेश करताच उघड्या अंगावर थंडीचा मारा झाल्यामुळे ऋषिकुमाराची अशी दातखीळ बसली की पाठ असलेली नक्कल बाहेर पडायलाच तयार होईना. म्हणजे रंगभूमीवरील माझे दुसरे पदार्पणही असे नि:शब्दच झाले.
एवढ्या रंगभूमीच्या परिचयानंतर शिक्षकांचा आग्रह झाला तरी पुन्हा तोंडाला रंग लावायचा नाही असा ठाम निश्चय मी केला.आणि हा निश्चय पुढे बरीच वर्षे टिकला.नोकरीनिमित्त औरंगाबादला गेल्यावर शासकीय वसाहतीत जागा मिळाली तेथे वसाहतीच्या स्नेहसंमेलनात एका वर्षी " दिवा जळू दे सारी रात" चा प्रयोग केला त्या वेळी माझ्यासारख्या ब्रह्मचाऱ्याला नाटकात काम करण्यापेक्षा त्यातील मुख्य काम करणाऱ्या युवतीवर आपला प्रभाव कसा टाकता येईल याचेच जास्त आकर्षण होते पण माझ्यासारखे बरेच भुंगे एकाच फुलाभोवती रुंजी घालत असल्यामुळे त्यात माझी दाळ शिजण्याचा संभव फारच कमी किंवा मुळीच नव्हता म्हटले तरी चालेल तरी पण प्रॉम्प्टरची भूमिका मी इमानेइतबारे संभाळली आणि नक्कल चोख पाठ करण्याच्या माझ्या गुणाचा फायदा एकादे पात्र योगायोगाने आजारी पडले तर मला होईल अशी पुसट आशा डोंबाऱ्याच्या गाढवाने त्याच्या सुस्वरूप पोरीशी लग्न करण्याची आशा बाळगावी तशी मी मनात बाळगली होती एवढे मात्र खरे पण तसा योग काही आला नाही.
त्यानंतर थोड्याच दिवसानी आमच्या महाविद्यालयाच्या स्नेहसम्मेलनात प्राध्यापकांनी एक नाटक करावे असे आमच्याचपैकी कोणाच्या तरी टाळक्यात शिरले.त्यावेळी आमचे विद्यार्थी चांगली नाटके करत असताना असली नसती उठाठेव करण्याचे खरे तर आम्हाला काही कारण नव्हते आणि त्यातही नि:शब्द भूमिकाच पार पाडण्याची सवय असलेल्या मला तर त्यात पडण्याचे मुळीच नव्हते.पण आतापर्यंत रंगभूमीवर इतरांनी मला ढकलल्यामुळे मी तिच्यावर अन्याय केला असा आरोप कुणी करू शकत नव्हते तेव्हां एकदा करूनच पाहू या असा विचार मी केला असल्यास नकळे !
या वेळी आम्ही पु. ल. देशपांडे यांचे " विठ्ठल तो आला आला " करायचे ठरवले होते आणि ते अतिशय विनोदी असल्याने आमच्या प्रयोगामुळे लोकांची हसून हसून पुरेवाट होईल असा आम्हाला विश्वास वाटत होता. त्यात मी विठ्ठलाची भूमिका करायचे ठरले आणि बराच वेळ आपण कडेवर हात ठेवून उभेच रहायचे असल्यामुळे आणि शेवटी विठ्ठल बोलतोय हे नाटकातील कुणालाच कळत नसल्यामुळे ही भूमिका आपण अगदी व्यवस्थित पार पाडू असा मला का कोण जाणे भरवसा वाटत होता.विठ्ठल बोलतो आहे हे नाटकातील कोणाला कळत नसले तरी बाहेर प्रेक्षकांना कळायला पाहिजे हे मात्र मी पारच विसरून गेलो.
मी नाटकात काम करणार आणि तेही विठ्ठलाचे या कारणामुळे कधी नव्हे ते माझ्या आईनेही त्यासाठी हजेरी लावली.
जोपर्यंत मी गाभाऱ्यात उभा राहून बोलत होतो आणि प्रेक्षकांना माझा फक्त आवाजच ऐकू येत होता तोपर्यंत माझ्या दृष्टीने सारे काही ठीक चालू होते कारण बाहेर काय चालू आहे हे मला दिसत नव्हते,नाहीतर प्राध्यापकांच्या तासाला आरडाओरडा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही इतकी उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे हे माझ्या लगेचच लक्षात आले असते.अर्थात आमचे नाटक योग्य दिशेने गेले असते तर कदाचित त्या विद्यार्थ्यानीही आवरते घेतले असते पण मी गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर तर मला पाहूनच जिकडे तिकडे हास्याचे स्फोट होऊ लागले इतका काळ्या रंगाचा मनसोक्त वापर आम्हाला रंगवणाऱ्या वेषभूषाकाराने केला होता. पण त्यामुळे हा भूमिका करणारा कोण माणूस आहे याचा अंदाज विद्यार्थ्यांनाच काय पण कोणालाच येऊ शकत नव्हता ही माझ्या दृष्टीने एक जमेची बाजू.
आजपर्यंत नाटकात केवळ नि:शब्द भूमिका करावयास मिळाल्याचा वचपा मात्र मी भरपूर आरडाओरडा करून भरून काढला. पण त्यावरून माझ्या लेक्चरला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा कोणाचा आवाज हे बरोबर ओळखून भरपूर शंखनाद करून आपला आनंद साजरा केला.एकूण पु. ल. देशपांडे यांनीही कल्पना केली नसेल इतका विनोदी प्रयोग करण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो फरक एवढाच की तो ऐकू आल्यामुळे विनोदी वाटला असता आणि हा मात्र ऐकू न येताच विनोदी झाला होता.नेहमीच संयमी प्रतिक्रिया व्यक्त करणारे आमचे प्राचार्य सुद्धा म्हणाले " या नाटकाचा इतका वाईट प्रयोग होऊ शकतो हे आम्हाला आजच समजले ." सगळ्यात मार्मिक प्रतिक्रिया होती माझ्या आईची ती म्हणाली,"माझ लेकरू विठ्ठल होणार म्हणून हौसेने बघायला आले आणि विठ्ठल गाभाऱ्यात होता तेच बरे होते उगीचच बाहेर आला अस वाटायला लागल" अर्थात माझ्या रंगभूमीवरील प्रवेशाची तेथेच समाप्ती झाली आणि त्याबद्दल मलाच काय पण कोणालाच दुःख झाले असेल असे मात्र वाटत नाही.
.