वाचनात भारत पुढेच

     वाचनप्रिय भारतीयांसाठी सुखद असा निष्कर्ष एका अभ्यासातून निघालेला आहे.
     एका आंतरराष्ट्रीय संस्थेने हा अभ्यास केला होता. दूरचित्रवाणी, नभोवाणी, पुस्तके-वृत्तपत्रे व इंटरनेट या चार माध्यमांचा कोणत्या देशात किती वापर केला जातो, हा संशोधनाचा विषय होता. अभ्यासासाठी ३२ देश निश्चित केले गेले होते. अभ्यासासाठी प्रश्नावली कोणती होती, किती जणांचा गट अभ्यासासाठी घेतला गेला होता,कोणत्या निकषांवर देश ठरविले गेले याची माहिती उपलब्ध नाही.
     अभ्यासानुसार, माहिती मिळविण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात भारतीय लोकच वाचनाचा पर्याय स्वीकारतात.वाचनाचा पर्याय स्वीकारण्यात दुसरा क्रमांक थायलंडचा आहे. तिसरा क्रमांक चीनचा आहे तर चोथा क्रमांक फिलीपाईन्सचा आहे. भारतीय लोक दर आठवड्याला सुमारे १०.७ तास वाचनात घालवितात तर उरलेल्या तीन देशांचे आकडे ९.४, ८.० व ८.६ असे आहेत.  अमेरिका व युनायटेड किंग्डम हे तथाकथित पुढारलेले देश वरच्या श्रेणीतही येत नाहीत. अमेरिकन माणूस वाचनासाठी आठवड्याला ५.७ तास घालवितो तर इंग्लिश माणूस ५.३ तास देतो. कोरिया, जपान व तैवान हे देश तळाशी आहेत. या देशांत आठवड्याला सरासरी तीन तास वाचन केले जाते.
    दूरचित्रवाणीचा वापर करणाऱ्यांमध्ये थायलंड, फिलिपाईन्स, ईजिप्त व तुर्की हे देश सर्वोच्च आहेत तर अमेरिका, युनायटेड किंग्डम हे देश सरासरीवर आहेत. भारताचा क्रमांक खालून चौथा आहे.
    नभोवाणीचा वापर करणाऱ्यांमध्ये अर्जेंटिना, ब्राझील, द.आफ्रिका व झेक रिपब्लिक हे देश सर्वोच्च आहेत. अमेरिका, युनायटेड किंग्डमने सरासरी गाठली आहे तर या क्षेत्रातही भारताला खालून चौथे स्थान मिळाले आहे.
    इंटरनेटचा वापर तैवान, थायलंड, स्पेन व हंगेरी या देशांत केला जातो तर अमेरिका, युनायटेड किंग्डमने सरासरीच्याही खालची पातळी गाठलेली आहे. या माध्यमाबाबत मात्र भारताला दूरचित्रवाणी व नभोवाणीपेक्षा थोडे वरचे स्थान आहे. भारताने नववे स्थान मिळविले आहे. 
    तीन-चार वर्षांपू्र्वीचा हा अभ्यास आज केला तर आकडेवारीत फरक निश्चित फरक पडेल. इंटरनेट व दूरचित्रवाणीमुळे सर्व जगातच वाचन कमी झाले आहे. हे निष्कर्ष कायमस्वरूपी आहेत असा दावा करता येणारच नाही. आधी उल्लेखिल्याप्रमाणे निकष काय होते, हे माहीत नाहीत पण एकूण भारतीय कल स्पष्ट करण्यास हा अभ्यास पुरेसा आहे.